निर्धारित वेळेनुसार लोकसभेच्या निवडणुका आधी होणार असल्या तरी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वच पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने चिंचवडऐवजी पिंपरीसाठी केलेले सुतोवाच, शिवसेनेचे भोसरीत नाटय़मय वळण, भाजपचा पिंपरीऐवजी भोसरीवर डोळा, चिंचवडला वाढलेले इच्छुक, पिंपरीतील त्रांगडे, भोसरीला तापलेले वातावरण आदी घडामोडी पाहता लोकसभेपूर्वीच आमदारकीच्या डावपेचांना उधाण आल्याचे दिसते.
आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांचा राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी विचार सुरू झाल्यापासून प्रतीक्षा यादीतील अनेकांना आमदार होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक अजून चित्र स्पष्ट नसल्याने बरीच संभ्रमावस्था आहे. खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या समर्थक नगरसेविका सुलभा उबाळे यांचा लांडेंकडून थोडक्यात पराभव झाला, तेव्हापासून भोसरीची जागा खेचून आणण्याचे उद्धव ठाकरे यांचे नियोजन आहे. अलीकडेच, खासदार गजानन बाबर समर्थक नगरसेविका सीमा सावळे भोसरीसाठी अचानक इच्छुक झाल्याने कलाटणीचे संकेत आहेत. इंद्रायणीनगरात वास्तव्य व पिंपरी-भोसरी मतदारसंघाच्या सीमेवर प्रभाग असलेल्या सावळे सुरुवातीला पिंपरीसाठी इच्छुक होत्या. मात्र, तो मतदारसंघ भाजपकडून मिळणे अवघड असल्याने त्यांनी आपला मोर्चा भोसरीकडे वळवला आहे. भोसरीत उबाळे-सावळे रस्सीखेच सुरू झाल्यास निर्णय घेताना सेनानेत्यांना तीव्र डोकेदुखी होणार आहे. गेल्या वेळी चाचपणी करून पाहणारे जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यंदाही इच्छुक आहेत. भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवारांच्या गटाला पिंपरी नको, भोसरीच हवा आहे. अदलाबदल करून पवारांना एकाच दगडात अनेक पक्षी मारायचे आहेत. तथापि, भाजपचे पिंपरीचे दावेदार अमर साबळे यांच्यामागे गोपीनाथ मुंडेंचे भक्कम पाठबळ असल्याने तसे होणे अवघड आहे. रिपाईला पिंपरीच हवा असून चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासाठी रामदास आठवले आग्रही असल्याने महायुतीत त्रांगडे होणार, हे उघड आहे. राष्ट्रवादीतही धुसफूस वाढते आहे. नगरसेवक महेश लांडगे, दत्ता साने आयोजित कबड्डी स्पर्धा चिखलीत झोकात झाल्या, पाठोपाठ, लांडेंनी मोशीत ‘शंभुराजे’ महानाटय़ घेतले. लांडे कुठे लढणार, यावर भोसरीचे बरेच काही अवलंबून आहे. चिंचवडऐवजी पिंपरीची मागणी करून काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सर्वानाच बुचकळ्यात टाकले. नाटय़मय घडामोडींनंतर राष्ट्रवादीने चिंचवड काँग्रेससाठी सोडला, तेव्हा अर्थपूर्ण घडामोडीनंतर भोईरांनी उमेदवारी मिळवली होती. अजितदादांनी मतदारसंघ देऊन आपलाच बंडखोर निवडून आणण्याचा बारामती डाव लक्ष्मण जगतापांच्या माध्यमातून खेळला होता. बहुतांश काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा तेव्हा पिंपरीसाठी आग्रह होता. पिंपरी काँग्रेसकडे असता तर कदाचित वेगळा निकाल अपेक्षित होता. भविष्यात राष्ट्रवादीने पिंपरी काँग्रेसला सोडला तरी चिंचवडचीच पुनरावृत्ती होणार आहे. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे बंडखोरी केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
अजितदादांना हवेत राष्ट्रवादीचेच आमदार
अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे शहरातील तीनही जागांवर त्यांना राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आणायचे आहेत. त्यादृष्टीने त्यांचे डावपेच राहणार आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ होण्याचे व धक्कातंत्राचे संकेत आहेत.