लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहर परिसरात छुप्या पद्धतीने बेकायदा सुरू असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने कात्रज – कोंढवा रस्त्यावर दारू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. त्यातून पोलिसांनी एक लाख ५७ हजारांची दीड हजार लिटर गावठी दारू (४५ कॅन) जप्त केली. तर, चालकाला अटक केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून होणार्‍या कारवायामुळे शहरात बेकायदा व्यावसायिक सक्रीय असल्याचे दिसून आले आहे.

भगत गणेश प्रजापती (२४, उरूळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. प्रजापती यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रजापती याच्यावर यापुर्वी देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे.

आणखी वाचा-पुणे- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी; अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कासवगतीने

पोलीस आयुक्तांकडून गावठी दारू विकणार्‍यांसह जूगार, मटका चालविणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेतल्यानंतर काही काळ शांत झालेल्या बेकायदा व्यावसायिकांनी पुन्हा एकदा छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू केली आहे. शहरालगतच्या लोणीकंद, लोणी काळभोर भागात पोलिसांनी यापुर्वी अनेकदा कारवाई करून गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहे. या भागातून शहरात छुप्या पद्धतीने दारू येते. गुन्हे शाखेच्या पथकाने दारू वाहतूकीचा टेम्पो पकडून दारूचे ४५ कॅन जप्त केले. त्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाकडे केलेल्या तपासणीत ही दारू बावधनकडे नेण्यात येत असल्याचे समोर आले. पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before ganeshotsav one and half thousand litters of gavathi liquor seized pune print news rbk 25 mrj