पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या मार्गाला मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प एकूण २ हजार ९५४ कोटी रुपयांचा असून, तो फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वारगेट ते कात्रज या मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावर बैठकीत आता शिक्कामोर्तब झाल्या असून या मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच हा विस्तारित मार्ग असणार आहे. हा संपूर्ण भुयारी मार्ग असेल आणि त्याची लांबी ५.४६ किलोमीटर असेल आणि तीन भूमिगत स्थानके या मार्गावर असतील. या प्रकल्पासाठी एकूण २ हजार ९५४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

आणखी वाचा-“बहिणींनो तुमचा सावत्र भाऊ खोटं…” असं अजित पवार का म्हणाले? कोण आहे सावत्र भाऊ?

स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महामेट्रोने राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने त्याला मंजुरी देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. दिल्लीत सार्वजनिक गुंतवणूक मंडळासोर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी जानेवारी महिन्यात हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली. अखेर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला.

सल्लागार नियुक्ती डिसेंबरमध्येच

महामेट्रोने या मार्गासाठी रचना सल्लागार नेमण्यासाठी निविदा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काढली. त्यात मार्गाची उभारणी, बोगद्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा, इमारतीची व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानकांची रचना यांची जबाबदारी रचना सल्लागाराकडे असणार आहे. ही निविदा मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्याआधीच काढण्यात आली असल्याने मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने या मार्गाचे काम सुरू करता येणार आहे. मंजुरीनंतर रचना सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेचा वेळ यामुळे वाचणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग

मार्ग – भुयारी
खर्च – २ हजार ९५४ कोटी रुपये
अंतर – ५.४६ किलोमीटर
स्थानके – मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज

प्रस्तावित दैनंदिन प्रवासी संख्या

वर्ष २०३७ – १.५८ लाख

वर्ष २०४७ – १.८७ लाख

वर्ष २०५७ – १.९७ लाख

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before the assembly elections green light for swargate to katraj metro pune print news stj 05 mrj