न्यायालयात शिक्षेवर म्हणणे मांडत असताना, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी ठरलेल्या मिर्झा हिमायत बेग याला रडू कोसळले. हुंदके देत त्याने आपण निरापराध असल्याचे सांगितले. आपला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असून कधीतरी सत्य समोर येईल आणि मला न्याय मिळेल. न्यायालयाने सर्व गोष्टीचा विचार करून दया दाखवावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली.
गेल्या सोमवारी बेगला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी धरले होते. त्याला शिक्षेवर आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्यासमोर खटल्याच्या कामकाजाला सुरूवात झाली. न्यायालयाने बेगला शिक्षेवर तुला काय बोलायचे आहे, असे बेगला विचारल्यानंतर त्याने सांगितले, ‘मी खोटे बोलणार नाही. माणसे मारून काय फायदा मिळणार आहे? ३१ जानेवारीला पुण्यात कार्यक्रमाला आलो होते. त्यानंतर कुठेही पळून गेलेलो नव्हतो. निरापराध मुलांना पकडले जात होते. मलाही पोलीस पकडतील या भीतीनेच घरात लपून बसलो होतो. बेकरीमध्ये निष्पाप बळी पडलेल्यांच्या खुनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माझा सहभाग नाही. मला भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आदर आहे. शंभर अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरापराधाला शिक्षा होणार नाही, हे न्यायव्यवस्थेचे तत्त्व आहे. बेकरीत मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय देताना दुसऱ्या निरपराधाला शिक्षा देऊन न्याय होऊ शकत नाही,’ असे सांगत असताना बेगला रडू कोसळले. थोडे थांबून बेगने हुंदके देत पुन्हा आपले म्हणणे न्यायालयास सांगण्यास सुरूवात केली.
तो म्हणाला, ‘या स्फोटात सतरा निरपराध लोक मेले. त्यात आता आणखी एका निष्पापाची भर पडत आहे. त्यांना न्याय मिळणार नाही. उलट मलाच शिक्षा मिळेल. मी अठरावा बळी ठरणार आहे. माझ्या विरुद्ध खोटे साक्षी पुरावे उभे केले गेले. आरडीएक्स मी कधी पाहिले सुद्धा नाही. राकेश मारिया, दिनेश कदम यांनी मला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविले आहे. त्यांना विनोद सातव यांनी साथ दिली. खऱ्या आरोपींना पकडण्यात अपयश आले. मी निरापराध आहे. माझा बॉम्बस्फोटाशी काही संबंध नाही.’ आपले हे म्हणणे ऐकून न्यायालयाने दया दाखवावी, अशी मागणी बेगने न्यायालयास केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beg begged for mercy before court
Show comments