भीक मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या तरुणीला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेबरोबर चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे ५२ तोळे सोन्याचे दागिने, २६ हजारांची रोकड, साडेपाच लाख रुपयांची मोटार असा एकूण मिळून ४० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिली दीपक पवार (वय २०, रा. आडगाव नाका, पंचवटी,नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. नगर रस्त्यावरील चंदननगर भागात एका घराचा दरवाजा उघडा असल्याचे मिली आणि तिच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने पाहिले. दोघे जण चंदननगर परिसरात भीक मागण्याचा बहाणा करून घरांची पाहणी करत होती. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दोघांनी ऐवज चोरला. त्यानंतर मिली आणि अल्पवयीन साथीदार पसार झाले. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

हेही वाचा >>> पिंपरी : अखेर तीन महिन्यांनी अजितदादांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात मिळाला शहराध्यक्ष; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

दागिने चोरून पसार झालेली तरुणी आणि साथीदार देवाची आळंदी परिसरात असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार महेश नाणेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी खडक आणि चंदननगर परिसरात चोरी कबुली दिली. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक अनिल माने, सहायक निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील,विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शीतल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा >>> ‘क’ दर्जाच्या मराठी चित्रपटांनाही आता अनुदान

काही मिनिटात चोरी

मिली पवार आणि अल्पवयीन साथीदार भीक मागण्याचा बहाणा करायचे. शहराच्या वेगवेगळ्या भागात ते फिरायचे. एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास दोघे जण पाहणी करायची. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते शिरायचे. काही मिनिटात ते कपाटातील ऐवज, रोकड चोरी करून पसार व्हायचे. भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात काही दिवसांपूर्वी त्यांनी चोरी केली होती. चंदननगर भागातील घरातून त्यांनी ५२ तोळे सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beggar woman arrested for stealing gold worth rs 35 lakh and cash from house pune print news rbk 25 zws