महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत सीमावाद पेटला आहे. मंगळवारी दुपारी कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे. या प्रकराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आलं आहे. हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आहेत. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविराेधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.
खरं तर, दररोज शेकडो गाड्या कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत असतात आणि तेवढ्याच गाड्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जात असतात. अनेकदा या गाड्या विश्रांतीसाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या केल्या जातात. पण आता सीमावाद उफाळल्यानंतर ह्या बसेस ठाकरे गटाच्या निशाण्यावर आल्या आहेत.
हेही वाचा- Maharashtra-Karnataka Border Dispute: बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक, वाद चिघळण्याची शक्यता
आज सकाळी बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये सहा गाड्याच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यात उमटले असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासलं आहे. बसेसच्या काचांवर ‘जय महाराष्ट्र’ असंही लिहिण्यात आलं आहे.