|| राजेंद्र येवलेकर

नैसर्गिक व औद्योगिक कचऱ्यातील टाकाऊ  घटकांपासून लाकूड, प्लायवूड, पार्टिकल बोर्ड यांना पर्यायी ठरणारी तीन प्रकारची संमिश्रे तयार करण्यात भोपाळ येथील अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स अँड प्रोसेस रीसर्च या सीएसआयआर संचलित संस्थेचे वैज्ञानिक डॉ. असोकन पप्पू यांना यश आले असून हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी खुले करण्यात आले आहे.

लखनौ येथील भारतीय विज्ञान महोत्सवाच्या निमित्ताने या संस्थेने तयार केलेल्या पर्यायी संमिश्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते त्यावेळी डॉ. पप्पू यांनी त्यांच्या या अभिनव संशोधनाची माहिती देताना सांगितले की, मार्बल निर्मिती, औष्णिक ऊर्जानिर्मिती व अ‍ॅल्युमिनियम निर्मिती यांसारख्या उद्योगात जो कचरा निर्माण होतो तो मोठय़ा प्रमाणात असतो. साधारण १ टन कोळशाच्या ज्वलनातून अर्धा टन फ्लाय अ‍ॅश तयार होते. बॉक्साइटपासून अ‍ॅल्युमिनियमची निर्मिती करताना जवळपास पन्नास टक्के टाकाऊ पदार्थ म्हणजे कचरा निर्माण होतो. पोलादनिर्मिती करताना ४५ टक्के  पोलादामागे पन्नास टक्के टाकाऊ  कचरा निर्माण होतो.

भारतात दरवर्षी ३५० मेट्रिक टन सेंद्रिय तर ४५० मेट्रिक टन अकार्बनी कचरा तयार होतो. त्याचा फेरवापर करून आम्ही एफपीसी— फ्लायअ‍ॅश संमिश्र, एमपीसी— मार्बल उद्योगातील कचऱ्यापासून संमिश्र, आरएमसी— बॉक्साइट कचऱ्यापासूनचे संमिश्र तयार केले आहे. यातील कचरा म्हणजे फ्लाय अ‍ॅश, मार्बल उद्योगातील द्रव टाकाऊ  पदार्थ, बॉक्साइट उद्योगातील रेड मड हा पदार्थ तसेच पॉलिमर (बहुलके) व नैसर्गिक तंतुमय धागे यांचे मिश्रण करून प्लायवूडसारखे बोर्ड तयार केले आहेत. ते म्हणाले की, यामुळे फर्निचरसाठी लाकूड वापरावे लागणार नाही. अगदी रेल्वे व इतर अनेक ठिकाणी यांचा वापर पार्टिशन, सिलिंग, दरवाजे, टाइल्स, भिंतीच्या टाईल्स  यासाठी करता येतो. बांधकामाचा खर्च कमी करतानाच ते अधिक दर्जेदार व मजूबत करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगाचे आहे.  सागवानासह, प्लायवूड, पार्टिकल बोर्ड यांच्यापेक्षा त्यांचे या संमिश्राचे गुणधर्म वेगळे आहेत. आकर्षक रंगात व मजबूत स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे त्याला मागणीही येत आहे. हे संमिश्र व त्यापासूनचे साहित्य तयार करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी जमिनीचा खर्च सोडून २ कोटी रुपये खर्च आहे पण त्यातून बऱ्यापैकी नफा मिळू शकतो. सागवानापेक्षा ते ३० टक्के स्वस्त, टिकाऊ  आहे. त्याला वाळवी व बुरशी लागत नाही. आग पसरत नाही. सिद्धी पॉली मॅट्रिक्स महाराष्ट्र, व्हीएसएम इंडस्ट्री गुजरात व इको ब्राइट कंपनी प्रा.लि यांनी हे तंत्रज्ञान सीएसआयआर या संस्थेकडून विकत घेतले आहे.

या शिवाय क्षकिरण तपासणी केंद्रात प्रारणांपासून रक्षण करण्यासाठी सध्या शिशाचा वापर केला जातो त्याला प्रारण संरक्षक संमिश्रही तयार करण्यात आले असून त्याला रॅडिएशन शिल्डिंग टेक्नॉलॉजी असे म्हणतात, या तंत्रज्ञानास नगर जिल्ह्यतून मागणी आली आहे, त्याला अणुऊर्जा आयोगानेही मान्यता दिली आहे,  असे त्यांनी सांगितले. सिमेंट मुक्त काँक्रिट व जिओपॉलिमर संमिश्र हे आणखी दोन प्रकार विकसित करण्यात आले असून त्यात ९० टक्के औद्योगिक कचऱ्याचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्टार्ट अप उद्योग सुरू करणे शक्य आहे.

पर्यायी संमिश्रे मजबूत व किफायतशीर

संमिश्रांची पारंपरिक  लाकूड व प्लायवूडच्या तुलनेत किंमत

संमिश्राची दारे (२५—३० मि.मी जाड) ४५०० ते ६००० रुपये (वाळवी, आग रोधक— अधिक मजबूत)

पारंपरिक दारे ( साग— १२ हजार, फायबर बोर्ड—५५००, जीआरपी—१२६०० रुपये

संमिश्राचे पॅनल्स (४—१२ मि.मी जाड)— २२ ते ८५ रुपये,  तुलनेने मॉडय़ुलर किचन पॅनल ४५० ते ८५० रुपये, प्लाय (१२ ते १८ मि.मी) ५० ते ७५ रूपये, फायबर बोर्ड  ४० ते ५० रुपये, पीव्हीसी— ११० रुपये, साग— २२५ रुपये