‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनासाठी हातात पुरेसा पैसा नसला तरी चालेल. नव्या कल्पनांच्या भांडवलावर उपलब्ध साहित्यानिशी चांगले संशोधन करता येते. तसेच संशोधन करताना ‘हे पूर्वी कुणी करून पाहिले आहे का’ असा सावध दृष्टिकोन नको. पूर्वी कुणीही न केले संशोधन प्रथम करण्याची पात्रता भारतीयांमध्ये आहे,’ असे मत ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ एम. एम. शर्मा यांनी व्यक्त केले.
एच. के फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ गणितज्ज्ञ एम. एस. नरसिंहन आणि भौतिक शास्त्रज्ञ दीपंकर दास सरमा यांना एम. एम. शर्मा यांच्या हस्ते एच .के. फिरोदिया पुरस्कार प्रदान करून बुधवारी गौरवण्यात आले. या वेळी शर्मा बोलत होते. पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. गोविंद स्वरूप, अरुण फिरोदिया या वेळी उपस्थित होते.
शर्मा यांनी आपल्या आणि आपल्या शिष्यांच्या संशोधन प्रवासाविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘संशोधनात सततच्या सरावाला पर्याय नाही. उपलब्ध साहित्यानिशी सातत्याने आपले संशोधन चालू ठेवणे आवश्यक ठरते. ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून प्रयोग करणे हा आमच्या संशोधनाचा पाया होता. संशोधनाला चालना मिळण्यासाठी उद्योगजगताशी असलेला संपर्कही महत्त्वाचा असतो.’’
माशेलकर म्हणाले, ‘‘राजकारणी मंडळी विज्ञान तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणत नाहीत असे नाही. ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रीसर्च’च्या (सीएसआयआर) संचालकपदी असताना मी हा अनुभव घेतला आहे. सध्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ०.९ टक्के विज्ञान व तंत्रज्ञानावर खर्च केले जाते. इतर देशांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर सरकार करत असलेल्या खर्चापेक्षा उद्योग क्षेत्राकडून होणारा खर्च अधिक आहे. आपल्याकडेही उद्योग क्षेत्राने संशोधन व विकासावरील खर्च वाढवला आहे. परंतु तो अधिक वाढवणे आवश्यक आहे.’’
‘..पण शिक्षणपद्धती आडवी येते!’
‘प्रत्येक मूल जन्मापासून प्रयोगातून शिकणाऱ्या शास्त्रज्ञासारखे असते, पण नंतर शिक्षणपद्धती आडवी येते!,’ असे सांगून दीपंकर दास सरमा म्हणाले, ‘‘परीक्षांमध्ये उत्तम मार्क मिळवणाऱ्या व्यक्ती संशोधनात उत्तम काम करू शकतील असे नाही. परीक्षांच्या उत्तरपत्रिका लिहिताना आपल्याला उपलब्ध पुस्तकांवर विश्वास ठेवून लिहावे लागते. पण जे लिहून ठेवले आहे, त्यावर अविश्वास दाखवून नवे शोधणे म्हणजे संशोधन.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा