पुणे : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होणार असून निकालावर अनेकांनी सट्टा लावला आहे.
कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाच्या गोदामात गुरुवारी (२ मार्च) मतमोजणी होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास २४ तासांचा कालावधी असून, या निकालावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा सट्टा घेण्यात आल्याची चर्चा आहे. बुधवारी (१ मार्च) एका रुपयावर एका उमेदवाराला ४५ पैसे आणि एका उमेदवाराला ५५ पैसे, असा भाव मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. दर तासाला सट्टेबाजारातील भाव बदलत असून, सट्टेबाज सट्टा खेळणाऱ्यांची खातरजमा करून सट्टा घेत आहे. पोलिसांच्या पथकांनी बेकायदा सट्टेबाजी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.
हेही वाचा – दहशत माजविणारा गुंड वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतील निकालावर कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. समाजमाध्यमातून पोटनिवडणुकीचा प्रचार करण्यात आला, निकाल जाहीर होण्यास २४ तासांचा कालावधी राहिला असून, कार्यकर्त्यांसह सामान्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.