विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात नेट-सेटमधून सूट देण्याबाबत हवे तसे बदल केल्याचा गौप्यस्फोट करणारी यूटय़ूब वरील व्हिडिओ फीत ब्लॉक करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दोन पत्रांमध्ये तफावत आढळली होती. यातील २६ ऑगस्ट २०११ च्या पत्रामध्ये हवे तसे बदल करून घेतल्याचा किस्सा प्राध्यापकांच्या एमफुक्टो या संघटनेच्या नेत्यांनीच सांगितले होते. त्याबाबतची व्हिडिओ फीत यूटय़ूबवर उपलब्ध होती. याबाबत लोकसत्ताने २१ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, ही व्हिडिओ फीत आता यूटय़ूबवरून काढून टाकण्यात आली आहे. या व्हिडिओ फितीमध्ये २६ ऑगस्टच्या पत्रामध्ये ‘हवे ते वाक्य’ कसे टाकण्यात आले, त्याचे वर्णन करण्यात आले होते. त्यामुळे नेट-सेट प्रकरणी यूजीसीने १६ ऑगस्ट आणि २६ ऑगस्ट २०११ ला दिलेल्या पत्रांबाबत संदिग्धता निर्माण झाली होती. ही दोन्ही पत्रे माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध झाल्याचा उल्लेख वृत्तामध्ये झाला होता. मात्र, अनेक विद्यापीठांच्या संकेतस्थळावरही ही पत्रे उपलब्ध होती. ही पत्रे आणि व्हिडिओ फीत प्राध्यापकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Story img Loader