आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्थानिक-बाहेरचा’ समतोल महत्त्वाचा

‘गाव ते महानगर’ अशी वेगवान वाटचाल करणाऱ्या िपपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरुवातीला स्थानिकांचा निर्विवाद वरचष्मा होता. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत गेली, तसे चित्र बदलत गेले. गेल्या काही वर्षांपासून ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा’, हा संघर्ष कायम चर्चेत राहिला आहे. ‘लक्ष्य २०१७’ ला सामोरे जाताना िपपरीत सर्वच प्रमुख पक्षांनी स्थानिक भूमिपुत्रांवर विश्वास दाखवत त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. विकासकामे, भ्रष्ट कारभार, परिवर्तन, गुंडाराज आदी मुद्दय़ांचा निवडणुकीवर प्रभाव राहणार असला तरी, बाहेरून येऊन शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांचे गणित सांभाळूनच सर्व पक्षांना रणनीती ठरवावी लागणार आहे.

सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर संजोग वाघेरे, भाजपच्या शहराध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी राहुल कलाटे आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सचिन साठे आहेत. स्थानिकांचे पाठबळ मिळवतानाच बाहेरील समाजबांधवांचा विश्वास संपादन करण्यात जो यशस्वी ठरेल, त्यांच्याकडे पालिकेची सूत्रे राहतील, हे उघड गुपित आहे. रामकृष्ण मोरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा गाडा हाकताना हा समतोल खुबीने सांभाळला होता, त्यामुळेच त्यांच्या पदरी यश आले होते. आता नव्या नेतृत्वाची त्यादृष्टीने कसोटी लागणार आहे.

शहराचे दुसरे महापौर भिकू वाघेरे यांचे संजोग हे चिरंजीव, त्यांनीही महापौरपद भूषवले. त्यांच्या पत्नी नगरसेविका उषा वाघेरे स्थायी समितीच्या अध्यक्षा होत्या. वाघेरे घराण्याचा िपपरीगावात प्रभाव असल्याचा राजकीय लाभ संजोग वाघेरे यांना वेळोवेळी झाला. आता भावकीतील तीव्र सत्तास्पर्धा, विरोधकांचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे आहे. स्वत:चा प्रभाग राखतानाच राष्ट्रवादीला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. राष्ट्रवादीला सत्तेची हॅट्रीक करायची आहे. पक्षात बरीच पडझड झाली असून, आहे त्या शिलेदारांच्या जोरावर हे उद्दिष्ट राष्ट्रवादीला साध्य करायचे आहे. राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या जगतापांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल सुरू आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार अशी पदे भूषवलेले जगताप हे शरद पवार यांच्या मुशीत आणि अजितदादांच्या सहवासात तयार झाले आहेत. आता त्यांना पवारांशीच ‘दोन हात’ करायचे आहेत. स्वत:ची राजकीय ताकद असलेल्या जगताप यांनी राष्ट्रवादीत ‘कर्तृत्व’ दाखवले आहे. तशीच कर्तबगारी त्यांना भाजपमध्ये दाखवावी लागणार आहे. संघटनात्मक कामाचा अनुभव असलेले िपपळे निलख निवासी सचिन साठे यांचे आतापर्यंत मुंबई-दिल्ली              (पान २ वर)

‘लक्ष्य २०१७’ साठी िपपरीत  भूमिपुत्रांकडेच नेतृत्वाची धुरा

असेच कार्यक्षेत्र होते. स्थानिक पातळीवर त्यांचा फारसा वावर नव्हता. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसने त्यांना िपपरी-चिंचवडला सक्रिय केले आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. नगरसेवकांचाच विरोध, पक्षांतर्गत गटबाजी असतानाही शक्य त्या पद्धतीने पक्षाचा गाडा हाकत पक्षाची भक्कम मोट बांधण्याचा साठे यांचा प्रयत्न आहे. अलीकडेच शिवसेनेत आलेले राहुल कलाटे यांची वाटचाल वेगवान स्वरूपाची आहे. लक्ष्मण जगताप यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक असलेल्या कलाटे यांचे पालिका निवडणुकीच्या काळात जगतापांशी तीव्र मतभेद झाले, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते शहरप्रमुख आहेत. कमी वयात मोठी जबाबदारी असलेल्या कलाटे यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Betting high on pmc polls due next year parties firm up strategies