लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखेच्या पथकांकडून सट्टेबाजांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.

कोंढव्यातील एका सोसायटीतील सदनिकेत आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून नऊ सट्टेबाजांना नुकतेच पकडले. या कारवाईत लॅपटॅाप, संगणक, मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरूसह देशभरातील मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर सट्टा घेतला जात असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल बेकायदा सट्टेबाजीतून होत आहे. देशभरातील सट्टेबाज समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात आहेत.

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी ॲपचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शहरातील अनेक हॉटेलमध्ये आयपीएल क्रिक्रेट सामन्यांचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण केले जात असून हॉटेलमध्ये येणारे अनेकजण ॲपचा वापर करून सट्टा खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा- पुणे : नगर रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; २१ किलो गांजा जप्त

शहरातील सट्टेबाजांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या पथकांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुन्हे शाखेची विविध पथकांना सट्टेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून सट्टेबाजांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

सट्टेबाजांच्या जाळ्यात तरुण

सट्टेबाजांच्या जाळ्यात अनेक तरुण सापडले आहेत. प्रलोभनाला बळी पडून अनेक तरुण आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत आहेत. काही तरुण कर्ज काढून तसेच व्याजाने पैसे घेऊन सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गेल्या वर्षी गुन्हे शाखेच्या पथकाने रास्ता पेठेतील एका सट्टेबाजावर कारवाई केली होती. त्या वेळी सट्टेबाजाच्या सदनिकेत पोलिसांना ९६ लाखांची रोकड सापडली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सट्टेबाजाकडे मिळेल, याचा अंदाज पोलिसांना नव्हता. अखेर पोलिसांनी नोटा मोजण्यासाठी यंत्र मागविले होते.