पिंपरी- चिंचवड : पिंपरीत क्रिकेट बुकिंवर पोलिसांची करडी नजर आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. बेटिंग प्रकरणी माजी नगरसेवकाच्या पुतण्यासह तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलिसांनी दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मयूर चंदर मेवानी, धीरज चंदर मेवानी आणि आकाश हरेश आहुजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. ही कारवाई राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असताना छापा टाकून कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी विष्णू गौतम भारती यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रिव्हर रोड येथे बंद खोलीत मयूर चंदर मेवानी, धीरज चंदर मेवानी आणि आकाश हरेश आहुजा हे आयपीएल च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी हे क्रिकेट लाईन गुरू ऍप वरून बेटिंग घेत होते. पिंपरी पोलिसांनी छापा मारून तिघांना ताब्यात घेऊन अटक केलं.

आरोपीकडून दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात पाच मोबाईल आणि रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५, १२ (अ) भारतीय टेलिग्राफ ऍक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे करत आहेत.