पुणे : पुणे ते दौंडदरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवारपासून प्रवासी गाड्या ताशी कमाल १३० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरूवात झाली. या मार्गावर वाढलेल्या वेगाने धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही पहिली गाडी ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून सकाळी १० वाजून ४२ मिनिटांनी निघाली आणि दौंडहून ती ११ वाजून ४३ मिनिटांनी पुढे मार्गस्थ झाली. पुणे-दौंड दरम्यानच्या एकूण ७६ किलोमीटर अंतरात गाडीने धावण्याचा पाच मिनिटांचा वेळ वाचवला. उद्या (मंगळवारी) आणखी दोन गाड्या या मार्गावर ताशी १३० किलोमीटर वेगाने धावणार आहेत. त्यात इंदोर – दौंड एक्स्प्रेस आणि मुंबई – बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>स्वतंत्र कार्यालयापेक्षा ‘को-वर्किंग स्पेस’ला पसंती; देशात पुणे आघाडीवर

मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने या विभागाची तांत्रिक पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या. अखेर या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर सोमवारी ताशी १३० किलोमीटर वेगाने पहिली गाडी या मार्गावर धावली. या मार्गावर गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी ट्रॅक तयार करणे, सिग्नलिंगसह इतर तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या बाबींवर योग्य लक्ष देऊन गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक

पुणे-दौंडदरम्यान सर्वच गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावण्याची योजना आखण्यात आली आहे. सर्व गाड्यांचा वेग हळूहळू वाढविला जाईल. याआधी या विभागात सर्व गाड्या ताशी ११० किलोमीटर वेगाने धावत होत्या.- डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Between pune to daund railway trains start running at a speed of 130 km per hour pune print news stj 05 amy