इंटरनेट बँकिंगसाठी तुम्ही दिलेला मोबाइल क्रमांक अचानक बंद झाला तर सावधान. कारण तुमच्या बँकेतील खात्यावरील रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे काढून घेतली जाऊ शकते. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्या असून त्यामध्ये जवळजवळ पन्नास लाख रुपये काढून घेतले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी संशयास्पद रीत्या मोबाइल बंद झाल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधून खात्यावरील व्यवहार थांबविण्यास सांगावे.
गेल्या आठवडय़ात आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय गोविंद धांडे (वय ५८, रा. पाषाण) यांची इंटरनेट बँकिंगद्वारे १९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे काढण्याचा ‘एसएमएस’  मोबाइलवर जाऊ नये म्हणून चोरटय़ांनी अगोदरच धांडे यांचे सीमकार्ड बंद केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर नऱ्हे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या संदीप मनोहर चवरे (वय ४१, रा. अतुलनगर, वारजे) यांच्या खात्यावरील सव्वाचार लाख रुपये याच पद्धतीने काढून घेतले होते. पैसे काढून घेण्याअगोदर त्यांचे ही सीमकार्ड बंद करण्यात आले होते. राजेश नितीनचंद्र कामदार (रा. नाना पेठ) यांच्या खात्यावरील १९ लाख रुपये काढून घेण्यात आले होते.
सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले, की बँकेत दिलेला मोबाइल क्रमांक संशयास्पद रीत्या बंद झाल्याचे लक्षात आल्यास पहिल्यांदा तत्काळ बँकेशी संपर्क साधा. त्या बँकेला खात्यावरील सर्व व्यवहार थांबविण्यास सांगा. पहिल्यांदा मोबाइल कंपनी ऐवजी बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. शहरात, मोबाइल बंद करून इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे काढल्याच्या घटनांचा सायबर शाखेकडून तपास सुरू आहे. तपासामध्ये काही गोष्टी मिळाल्या असून त्यावर काम सुरू आहे. सायबर शाखेने अशा पद्धतीने पैसे जाण्याच्या अगोदर वाचविले आहेत.
चौकट
.असे केले जाते बँकेचे खाते हॅक!
सायबर गुन्हेगार हे दोन पद्धतीने आपल्या खात्यावर हल्ला करतात. ग्राहकांनी मोबाइल कंपन्यांकडे सर्व माहिती भरून दिलेले अर्ज त्यांना काही ठिकाणी मिळतात. त्यातून ही माहिती हे सायबर गुन्हेगार मिळवतात किंवा मोबाइल कंपनीकडे नवीन सीमकार्ड घ्यायचे असल्यामुळे मोबाइल क्रमांक बंद करण्यास सांगतात. त्यानंतर सीमकार्ड बंद होते. मात्र, सीमकार्ड बंद करण्याअगोदर ते इंटरनेट बँकिंगद्वारे खाते हॅक करून खात्याची सर्व माहिती मिळवतात. ग्राहक इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे भरताना किंवा काढताना एखाद्या वेळी असुरक्षित ट्रॅन्झ्ॉक्शन झाल्यानंतर आरोपींना ही माहिती मिळते. या माहिती मिळाल्यानंतर खात्यावरील पैसे काढल्याची माहिती जाऊ नये म्हणून मोबाइल क्रमांक बंद करतात. त्यानंतर खातेदाराच्या मिळालेल्या माहितीचा उपयोग करून पैसे विविध राज्यातील वेगवेगळ्या खात्यांवर हस्तांतर करतात. त्याच बरोबर या पैशाने ऑनलाइन खरेदी, एखाद्या वस्तू खरेदीचे पैसे देतात. सायबर गुन्हेगार अशा खाते क्रमांकावर पाळत ठेवून असतात, असे माहिती तंत्रज्ञान सुरक्षातज्ज्ञ हृषीकेश नांदेडकर यांनी सांगितले.

Story img Loader