लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी दोन तरुणांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफीत, तसेच जाहिरातींना दर्शक पसंती (व्ह्यूज) मिळवून दिल्यास भरपूर पैसे मिळतात, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला सुरुवातीला काही पैसे दिले. ऑनलाइन टास्क व्यवसायात पैसे गुंतविल्यास चांगला नफा होईल, असे चोरट्यांनी तरुणाला सांगितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यावर सहा लाख ५५ हजार ८०० रुपये पाठविण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी पैसे जमा केले. त्यानंतर त्याने चोरट्यांकडे परताव्याची मागणी केली. तेव्हा चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन तपास करत आहेत.

आणखी वाचा-अबब! तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड

दरम्यान, सायबर चोरट्याने वानवडी परिसरातील एका तरुणाची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे. चोरट्यांनी तरुणाला ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तीन लाख ८० हजार रुपये उकळले. घरातून काम करण्याची संधी असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले. तरुणाने याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.

शहरात गेल्या वर्षभरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी चोरट्यांना वेळोवेळी आवाहन केले. मात्र, जादा पैसे कमविण्याच्या मोहापायी अनेक तरुण चोरट्यांच्या जाळ्यात अलगद सापडत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beware of online tasks this is new type of scam by cyber thieves pune print news rbk 25 mrj