महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भारतात आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळाल्याचं वक्तव्य केलंय. इंग्रज क्रांतिकारकांना घाबरले. क्रांतिकारकांचे बंड पाहून पुढे हे बंड वाढतील असं इंग्रजांना वाटलं. त्यामुळेच त्यांनी बंड वाढण्याआधीच महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहानंतर भारत सोडला, असंही त्यांनी नमूद केलं. ते पुण्यातील चिंचवडगावात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे बोलत होते.
भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आपल्याला आज जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे मिळालं आहे. क्रांतिकारकांना इंग्रज घाबरले. क्रांतीकारकांचे बंड पाहून ही तर सुरुवात आहे, पुढे हा बंड वाढेल असं इंग्रजांना वाटलं. त्यामुळेच बंड होण्याआधी इंग्रज महात्मा गांधी यांच्या सत्यगृहानंतर भारत सोडला. महात्मा गांधी यांचा खूप सन्मान आहे आणि तो केला पाहिजे. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे.”
“क्रांतिकारकांनी बंड केला नसता, तर गांधींच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळण्यास आणखी वेळ लागला असता”
“मी हे म्हणतो आहे की क्रांतिकारकांचं काम गांधीजींना पूरक ठरलं. जर क्रांतिकारकांनी बंड केला नसता, तर गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाला आणखी वेळ लागला असता. एकीकडे बापूंचा सत्याग्रह आणि दुसरीकडे क्रांतिकारक शस्त्र घेऊन उभे राहिल्याने इंग्रजांनी भारत सोडला,” असं कोश्यारी यांनी सांगितलं.
“सरकारच्या मदतीशिवाय आत्मनिर्भर होऊ शकतो असा प्रयत्न करा”
कोश्यारी पुढे म्हणाले, “सध्या कामाला महत्व देण्याची आवश्यकता आहे, नोकरीला नाही. कशाप्रकारे देशाला पुढे नेऊ शकतो त्या दिशेने काम करा. येथील मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न गिरिष प्रभुणे करत आहेत. तसेच आपण सर्व जण सरकारच्या मदतीशिवाय आत्मनिर्भर होऊ शकतो, असा प्रयत्न कराल.” क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २ दिवसीय प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना भगतसिंह कोश्यारी यांनी हे आवाहन केले.
हेही वाचा : “महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना…”, वरुण गांधींनी पीलिभीतमध्ये बोलताना सोडलं टीकास्त्र!
“पुनरुत्थान गुरुकुलममध्ये काही वस्तू बनवल्या जातात. फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तू चकाकणाऱ्या दिसतील. पण, येथील गुरुकुलममध्ये बनवलेल्या वस्तू नैसर्गिक आहेत. ते घेऊन गेलात, तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल. यावर आपण विचार करायला हवा. तेव्हा आपण यात सहभाग घेतला असं समजू,” असंही राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केलं.