महापालिकेच्या रिक्त झालेल्य आरोग्य प्रमुख पदावर डाॅ. भगवान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याबाबातचे आदेश काढले आहेत. डाॅ. भगवान पवार जिल्हा परिषदेचे आरोग्य आधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची महापालिकेत दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांची बदली करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गातील डाॅ. आशिष भारती यांची ३० सप्टेंबर २०२० मध्ये महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२२ मध्ये डाॅ. आशिष भारती यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यासंदर्भातील आदेश काढले होते. या जागेवर डाॅ. भगवान पवार यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळालेला नाही. डाॅ. भारती यांच्यापूर्वी डाॅ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे प्रतिनियुक्तीने ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. डाॅ. भारती यांची बदली करण्यात आल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीने अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.