राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती असूच नये, असे स्पष्ट मत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मांडले.
राज्य सरकारने प्रसिद्ध लेखक-प्रकाशक बाबा भांड यांची राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. काही वर्षांपूर्वी खडू-फळा योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भांड यांच्यावर असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे भांड यांच्या नियुक्तीसंदर्भात साहित्य वर्तुळातून टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर नेमाडे यांना विचारले असता त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती अध्यक्षपदी असूच नये, असे मत व्यक्त केले.
आरोप असणे आणि ते सिद्ध होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती महत्त्वाच्या पदावर असू नये. मात्र, व्यवहारात तसे असत नाही. असे आरोप असलेले राजकारणी निवडणूक लढवितात आणि नंतर महत्त्वाच्या पदावर असतात, याकडेही नेमाडे यांनी लक्ष वेधले. भांड यांना मी त्यांच्या विद्यार्थिदशेपासून ओळखतो. ते भ्रष्टाचार करतील, असे वाटत नाही, असेही नेमाडे यांनी सांगितले.
 बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नको
बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले शिवाजीमहाराजांचे चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी भूमिका भालचंद्र नेमाडे यांनी मांडली. बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी अजिबात शंका घेता येणार नाही. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. मात्र, शिवाजीमहाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचे लेखन माझ्या आकलनामध्ये बसत नाही, असेही नेमाडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा