पिंपरी : शहराला भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम धिम्या गतीने सुरू आहे. या कामाची चार वर्षांची मुदत संपली तरी काम अपूर्णच आहे. आजअखेर जलवाहिनीचे काम केवळ ४८ टक्के झाले असल्याने संबंधित ठेकेदाराला नाेटीस देण्यात येणार आहे. आता आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दररोज पाण्यासाठी शहरवासीयांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या पवना ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असा ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा केला जात आहे. मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो. शहराची झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या चारही बाजूंनी मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित होत आहेत. परिणामी, शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे.
हेही वाचा – पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठी घडामोड, आयुक्तांनी घेतली बैठक दिले आदेश !
े
वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने आंद्रातून शंभर एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे २६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. यासाठी पाणी पुरवठा विभागाने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया लि. या ठेकेदाराला दिले. नवलाख उंबरेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे संपूर्ण काम १६२ काेटी रुपयांचे आहे. याचा कार्यारंभ आदेश १५ डिसेंबर २०२० राेजी दिला हाेता. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची हाेती. मात्र, या मुदतीत १९ किलाेमीटरपैकी केवळ नऊ किलाेमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.
भूसंपादनाला विलंब
जलवाहिनीचा ४० टक्के भाग राज्य शासनाच्या आस्थापनेअंतर्गत येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत आणि वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या आस्थापनांकडून परवानगी घेण्यास विलंब झाला. उर्वरित दहा किलोमीटर जलवाहिनीच्या कामापैकी अडीच किलाेमीटर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित साडेसात किलाेमीटरसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
आंद्रा धरणाच्या जलवाहिनीचे काम सुरू नाही
आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंबरे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. या मार्गात साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात येते.
हेही वाचा – झाकणांमुळे होतोय जीव ‘वर-खाली’, कोणत्या भागात घडतोय हा प्रकार !
अतिरिक्त आयुक्तांकडून झाडाझडती
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामाच्या संथगतीवरून नाराजी व्यक्त करत ठेकेदाराची झाडाझडती घेतली.
ठेकेदाराला कामासाठी दिलेली चार वर्षांची मुदत संपली आहे. बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ठेकेदारला नाेटीसही बजाविण्यात येणार आहे. उर्वरित कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे विचाराधीन असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमाेद ओंभासे यांनी सांगितले.