संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारण्याचा निर्णय भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाने मंगळवारी घेतला.
अंतर्गत राजकारणाने पोखरलेल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांमधील वादाला कंटाळून डॉ. सदानंद मोरे यांनी संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. पदाधिकाऱ्यांमध्ये वादविवाद असताना आणि काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली असताना येथील गढूळ वातावरणामध्ये आपल्याला काम करणे अशक्य असल्याची भूमिका घेत त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये हा राजीनामा स्वीकारु नये, अशीच सर्व सदस्यांनी भूमिका घेतली.
यासंदर्भात संस्थेचे मानद सचिव अरुण बर्वे म्हणाले,‘‘डॉ. सदानंद मोरे यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात येऊ नये, अशीच सर्व सदस्यांनी एकमुखी मागणी केली. यासंदर्भात मी डॉ. सदानंद मोरे यांना पत्र पाठवून नियामक मंडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांमधील वाद निवळण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात येत असून आपण संस्थेच्या कामामध्ये योगदान द्यावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे.’’

Story img Loader