प्राच्यविद्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ (इन्स्टिटय़ूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स) हा दर्जा संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) संस्थेला हा दर्जा मिळाल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत भांडारकर संस्था हा दर्जा संपादन करण्यासाठी पुढे सरसावली असून २०१५-१६ या संस्थेच्या शताब्दी वर्षांत हा बहुमान मिळावा हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
‘एफटीआयआय’ला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था हा दर्जा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर भांडारकर संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ‘एफटीआयआय’चे संचालक डी. जे. नारायण यांच्याशी नुकतीच सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर, मानद सचिव डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. सुधीर वैशंपायन, वसंत वैद्य आणि भूपाल पटवर्धन यांचा त्यामध्ये समावेश होता. गेल्या ९७ वर्षांतील संस्थेचे कार्य, संस्थेकडे असलेला अनमोल ठेवा, संस्थेची मालमत्ता आणि संस्थेच्या भावी योजना या साऱ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण (डॉक्यूमेंटेशन) करून ते केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकर यांनी दिली. संस्थेची ही माहिती केंद्राकडे गेल्यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाने नियुक्त केलेली समिती संबंधित संस्थेला भेट देऊन पाहणी करते. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर होतो. त्यानंतर केंद्र सरकारतर्फे या विषयीचा निर्णय घेतला जातो. ही सारी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याचे राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय महत्त्वाची संस्था हा दर्जा मिळाल्यानंतर संस्थेला पाली, जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानासंदर्भातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानकांची (स्टँडर्ड्स) पूर्तता करणारे संग्रहालय करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यासाठी शिकागो येथील वीणा मांद्रेकर यांच्यासह परदेशातील तीन संग्रहालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या संग्रहालयामुळे अभ्यासकांसह सामान्य नागरिकांना संस्थेकडे आकृष्ट करून घेणे शक्य होणार आहे, असेही राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.
‘भाषेचा संस्कृती कोश’ या विषयातील मूलभूत संशोधन कार्याबद्दल पां. वा. काणे यांना आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळाला होता. हा मूळ ग्रंथ दुर्मिळ असून अभ्यासक त्याच्याआधारे अभ्यास आणि संशोधनकार्य करीत आहेत. मात्र, सामान्य नागरिकांना हे ज्ञान सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून खंडरूपात प्रकाशित करावे, असा निर्णय संस्थेच्या नियामक मंडळाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या कामकाजात मराठीवर भर
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीच्या कार्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भाषेचे प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी प्रा. हरी नरके, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी तीन वर्षे परिश्रम घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून संस्थेने अभिजात मराठी भाषा केंद्र सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर संस्थेने कामकाजामध्ये मराठी भाषेच्या वापरावर भर दिला आहे. संस्थेचा पत्रव्यवहार आणि सभेचे कामकाजवृत्त इंग्रजीबरोबरच मराठीमध्येही प्रकाशित केले जात आहे, असेही राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा