शताब्दीकडे वाटचाल करीत असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या आगामी त्रैवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कार्यकारी मंडळाच्या अखेरच्या बैठकीमध्ये तब्बल ४३ जणांना संस्थेचे आजीव सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. एकाच बैठकीमध्ये विक्रमी सभासदत्वाचे अर्ज मंजूर करून संस्थेने इतिहास घडवला आहे.
भांडारकर संस्थेच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी निवडणूक होते. संस्थेचे आजीव सभासद या निवडणुकीचे मतदार असतात. सध्या ही संख्या सुमारे २२०० आहे. संस्थेच्या घटनेनुसार ५ जून रोजी २५ जणांचा सहभाग असलेले नियामक मंडळ आणि ६ जुलै सात जणांचे कार्यकारी मंडळ अस्तित्वात येते. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ता काबीज करण्याच्या उद्देशातून संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये एकाच वेळी ४३ जणांचे आजीव सभासदत्वाचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. एका दमात सभासदत्व बहाल करण्याची ही सर्वोच्च संख्या असल्याची माहिती पुढे आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालामध्ये संस्थेचे शताब्दी वर्ष येत असल्यामुळे सत्तासंपादनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या संस्थेच्या आजीव सभासदत्वाचे शुल्क सहा हजार रुपये आहे. ४३ जणांच्या सभासदत्वामुळे संस्थेच्या तिजोरीमध्ये मात्र अडीच लाख रुपयांची भर पडली आहे.
अशी असते निवडणूक प्रक्रिया
निवडणूक असलेल्या वर्षी १५ फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू होते. एक मार्चपूर्वी मतदारांची यादी आणि त्यासमवेत उमेदवारीअर्ज हा प्रत्येक मतदाराला पाठविला जातो. या निवडणुकीसाठी उभे राहण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी उमेदवारीअर्ज १५ एप्रिलपूर्वी सादर करावयाचा असतो. १५ एप्रिल रोजी मतपत्रिका मतदारांना रवाना केल्या जातात. मतदारांनी ५ जूनपूर्वी आपल्या मतपत्रिका संस्थेकडे परत पाठवायच्या असतात. ५ जून रोजी मतमोजणी होऊन २५ जणांचे नियामक मंडळ अस्तित्वात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा