पुणे : भारत फोर्ज कंपनीकडून ॲडव्हान्स्ड टोअ्ड आर्टिलरी गन सिस्टीम्स (एटॅग्ज) तोफांचा पुरवठा संरक्षण मंत्रालयाला केला जाणार आहे. याचबरोबर युरोपीय देशांतूनही एटॅग्ज तोफांना मागणी वाढत आहे, अशी माहिती भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांनी बुधवारी दिली.

कल्याणी म्हणाले की, आम्ही भारतीय लष्कराला तोफांचा पुरवठा करण्याच्या आधीपासून युरोपीय देशांना तोफांची निर्यात करीत आहोत. आम्ही गेल्या वर्षी १०० तोफांची निर्यात केली. त्यात ९० एटॅग्ज तोफांचा समावेश आहे. युरोपीय देशांतून या तोफांना मागणी वाढत आहे. अमेरिका, फ्रान्ससारख्या आघाडीच्या संरक्षण उत्पादन देशांना या तोफांचा पुरवठा केला जाणार आहे. जागतिक पातळीवर आमच्या तोफांची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. सध्याच्या भूराजकीय स्थितीचा विचार करता युद्धात तोफांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर हे प्रकर्षाने समोर आले आहे.

भारतीय लष्कराकडून जुन्या तोफांच्या जागी नवीन तोफा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात तोफांना मोठी मागणी असेल. एटॅग्ज तोफांचा पल्ला ४८ किलोमीटर आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था आणि शस्त्रास्त्र संशोधन व विकास संस्थांनी या तोफा विकसित केल्या आहेत. या तोफांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. एकदा हल्ला केल्यानंतर त्या तातडीने त्यांची जागा बदलता येते. त्यामुळे शत्रूला या तोफा नष्ट करणे शक्य होत नाही, असेही कल्याणी यांनी स्पष्ट केले.

जेजुरीत नवीन उत्पादन प्रकल्प

भारत फोर्जकडून संरक्षण उत्पादन क्षमतांचा विस्तार केला जात आहे. यासाठी कंपनीने जेजुरीत नवीन संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प ३ लाख चौरस फुटांवर विस्तारलेला आहे. ही जागतिक दर्जाची उत्पादन सुविधा असून, त्यात स्वदेशी बनावटीच्या तोफांची निर्मिती केली जाईल. याचबरोबर कृत्रिम प्रज्ञेसह इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, असे बाबा कल्याणी यांनी नमूद केले.