महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठय़ा शहरात शाखांचे जाळे विणणाऱ्या भारती विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव श्री. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या दि. १० रोजी पुण्यात साजरा होणार आहे. शिक्षणाच्या खासगीकरणाच्या शासनाच्या निर्णयापूर्वीच डॉ. पतंगराव कदम यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी गणित आणि इंग्रजी या विषयाच्या स्पर्धा परीक्षा या संस्थेमार्फत घेण्यात येत. त्यानंतर या संस्थेने अतिशय वेगाने प्रगती करत अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केला.
महाराष्ट्रात आणि देशात व परदेशात या संस्थेच्या १७० हून अधिक शाखा, उपशाखांच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक स्तरापासून पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण दिले जाते. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याकडून आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने अभिमत विद्यापीठांच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही भारती विद्यापीठाला नुकताच ‘अ’ दर्जा दिला आहे.
महाराष्ट्रातील खासगी शिक्षणसंस्थांमध्ये भारती विद्यापीठाचे नाव आवर्जून घेतले जाते. भारती विद्यापीठाच्या  दिल्ली, मुंबई, पुणे, सांगली, पाचगणी येथे विद्यापीठाचे सुसज्ज शैक्षणिक परिसर आहेत. राज्यातील दुर्गम भागातही विद्यापीठाचा विस्तार झाला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात भारती विद्यापीठामार्फत १४ विद्याशाखांचे शिक्षण दिले जाते. राज्यभरात ६७ महाविद्यालये भारती विद्यापीठाशी संलग्न आहेत. या सर्व शिक्षण संकुलांमध्ये वर्षभर अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
डॉ. पतंगराव कदम यांनी मे १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची पुण्यात स्थापना केली. एका खोलीत सुरू झालेल्या या शिक्षणसंस्थेला २६ एप्रिल १९९६ ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि ‘भारती विद्यापीठ विश्वविद्यालया’ची स्थापना झाली. खासगी शिक्षणसंस्थेला सहसा न परवडणारे पर्यावरणशास्त्र, समाजकार्य, शारीरिक शिक्षणशास्त्र असे अभ्यासक्रमाही भारती विद्यापीठ समर्थपणे चालवत आहे. याशिवाय स्त्री अभ्यास केंद्रामार्पत महिलांच्या विविध प्रश्नांचा अभ्यासही या विद्यापीठात सुरू आहे.
शैक्षणिक प्रगती साधतानाच विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी भागामध्ये भारती विद्यापीठाकडून इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या निवासी शाळा चालवल्या जात आहेत. अभियांत्रिकी, कला, विज्ञान, वाणिज्य या विद्याशाखांची काही महाविद्यालये भारती विद्यापीठामार्फत फक्त मुलींसाठी चालवली जात आहेत. या शिवाय काही शाळा आणि एक तंत्रनिकेतन संस्थाही फक्त मुलींसाठी चालवली जाते. या तंत्रनिकेतनामध्ये मुलींसाठी कमी शुल्कामध्ये प्रशिक्षणाची आणि निवासाची सोय केली जाते. भारती विद्यापीठ गेली ४७ वर्षे ‘विचारभारती’ हे नियतकालिक चालवते. या शिवाय अनेक ग्रंथांचे प्रकाशनही या प्रकाशनसंस्थेच्या माध्यमातून केले जाते. ग्रामीण साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शताब्दी वर्षांचा समारोह, अखिल भारतीय कुलगुरू परिषद, भारतीय अर्थशास्त्र परिषदेचे वार्षिक अधिवेशन, औषधनिर्माण शास्त्राची आंतरराष्ट्रीय परिषद अशा अनेक परिषदांचे भारती विद्यापीठाने यजमानपद भूषवले आहे.

Story img Loader