लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : बालेकिल्ल्यातील पोटनिवडणुकीतील पराभवामुळे सावध झालेल्या भारतीय जनता पक्षाने कसबा विधानसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याअंतर्गत ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’अंतर्गत दुसरा कार्यक्रम कसबा विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला. कसबा मतदारसंघाची जबाबदारी असलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात नियमितपणे भेट देऊन नागरिकांच्या समस्या समजून त्या सोडविण्यावर भर दिला आहे. या उपक्रमाला ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. त्याअंतर्गत कसबा मतदारसंघात दुसरा कार्यक्रम रविवारी झाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे उपस्थित होते.

आणखी वाचा-अजित पवार शिरूरमधून लढणार?

दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला बालेकिल्ल्यातच पराभूत व्हावे लागले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर सावध झालेल्या भाजपने कसबा मतदारसंघावर यापूर्वीच लक्ष्य केंद्रीत केले आहे. नागरिकांच्या सातत्याने भेटी गाठींना प्राधान्य देण्यात येत असून नागरिकांच्या अडचणीसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकाही घेतल्या जात आहेत. त्याअंतर्गत रविवारी या उपक्रमाच्या माध्यमातूनही नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या.

टपाल कार्यालयाच्या विविध योजना, तहसील कार्यालय, पॅनकार्ड-पासपोर्ट-शॉपॲक्ट-उद्यम आधार विभाग,पंतप्रधान विश्वकर्मा विभाग, पंतप्रधान अन्नसुरक्षा, रेशनकार्ड, नगरभूमापन, समाजविकास अंतर्गत दिव्यांगांसाठी विविध योजना, पंतप्रधान आयुष्मान कार्ड विभाग, शहरी गरीब आणि मतदार नोंदणी अशा विविध केंद्र, राज्य शासनाच्या योजनांचे स्टॉल या वेळी लावण्यात आले होते. नागरिक नावनोंदणी करून आपले काम असलेल्या स्टॉलकडे जाऊन माहिती घेत होते. महापालिका, राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-दागिने घडविणाऱ्या कारागिरांकडून पावणेदोन कोटींचे सोने चोरी, पश्चिम बंगालमधील कारागिरांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, वैयक्तिक पातळीवरील समस्या, सार्वजनिक प्रश्न आणि विविध सूचना यांसह नवीन कल्पनासंदर्भात नागरिकांशी चर्चा झाली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या आणि सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे, असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

‘डीएसके’च्या गुंतवणूकदारांच्या पाठीशी- मुरलीधर मोहोळ

डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यात ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या पुढाकाराने डीएसके गुंतवणूकदारांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. गुंतवणूकदारांचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी सरकार आणि पक्ष म्हणून देखील गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहू ,असे आश्वासन दिले. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली ५०० गुंतवणूकदार उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiya janata partys mp public relations service campaign in kasba assembly constituency pune print news apk 13 mrj