राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारविरुद्ध भारतीय जनता युवा मोर्चा एल्गार पुकारणार आहे. क्रांतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (९ ऑगस्ट) बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी अकरा वाजता ‘भाजयुमो’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याने त्याचा प्रारंभ होणार असून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा स्वरुपाचे एल्गार मेळावे होणार आहेत.
‘भाजयुमो’च्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष गणेश घोष, संदीप खर्डेकर आणि शिक्षण मंडळ सदस्या मंजुश्री खर्डेकर या प्रसंगी उपस्थित होत्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. तेच ध्येय ठेवून युवकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे प्रश्न हाती घेऊन आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात येत आहे. मात्र, यात्रा काढण्याऐवजी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये मेळावे घेण्यात येतील. राजकीयदृष्टय़ा सक्रिय असलेल्या पुणे शहरातून या एल्गार मेळाव्याची सुरूवात करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, बेरोजगारी, भविष्यातील आव्हाने हे युवकांचे प्रश्न या मेळाव्यांतून मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे युवक असल्याचे चित्र दिसत असले तरी हे युवक भाजयुमोकडे आकर्षित होतील असा विश्वास वाटतो, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयीन निवडणुका सुरू व्हाव्यात अशी पक्षाची भूमिका आहे. १८ व्या वर्षी लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळालेले युवक आपला वर्ग प्रतिनिधी निवडू शकत नाहीत का? त्यामुळे या निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या लिंगडोह समितीच्या शिफारसींचे आम्ही स्वागत करतो. मात्र, राजकीय हस्तक्षेपाविना या निवडणुका झाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व महाविद्यालयीन निवडणुकीतूनच घडले आहे.
मुंडे विरुद्ध मुंडे ही लढत
मुंडेसाहेबांसाठी सोपीच
बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे अशी लढत होण्याची शक्यता आहे याकडे लक्ष वेधले असता पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या, मुंडे विरुद्ध मुंडे ही लढत मुंडेसाहेबांसाठी सर्वाधिक सोपी निवडणूक असेल. कोणीही भावनिक आवाहन केले तरी त्याला जनता बळी पडणार नाही. मुंडेसाहेबांनी केलेल्या विकासकामांमुळे जनता आमच्याच पाठीशी आहे. मुंडेसाहेबांनी यापूर्वी अनेक कठीण निवडणुकांमध्ये यश संपादन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा