पुणे : मोदी भारताचे हिटलर, अमित शहा गोबेल्स आहेत. या दोघांनी कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधींना बदनाम केले. मोदी यांच्या कारभारामुळे देश अडचणीत आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील नेते, भारतीय रक्षक आघाडी प्रमुख टेक्सास गायकवाड यांनी केली. आजचा काळ पक्ष वाचवण्याचा नाही, तर संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा…..तर मला मत मागताना शरम वाटली असती, अजित पवार असे का म्हणाले?

गायकवाड म्हणाले, की देश आणि देशाचे संविधान धोक्यात असताना कट्टर आंबेडकरवादी शांत बसत नाही. त्यामुळे भारतीय रक्षक आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे गेल्या निवडणुकीत भाजपला ताकद मिळाली, हे आंबेडकरी जनतेला समजले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने वंचितच्या सभांना गर्दी केली, तरी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहील.

आंबेडकरी जनतेने रामदास आठवले, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, मायावती यांचा बहुमान राखावा. मात्र त्या सोबतच संविधानाचाही विचार करावा. नेत्यांच्या मानापेक्षा संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मान महत्वाचा आहे, असेही टेक्सास गायकवाड म्हणाले.

हेही वाचा…माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

दलितांवर अन्याय होत असताना, संविधानाची मोडतोड होत असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्षाबरोबर राहून चूक करत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिड आहे. रामदास आठवले यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे टेक्सास गायकवाड त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiya raksha aghadi leader texas gaikwad compares modi to hitler amit shah to goebbels pune print news ccp 14 psg