पिंपरी पालिकेच्या वतीने १३० कोटी रूपये खर्च करून उभारलेल्या कासारवाडी-नाशिकफाटा या दुमजली उड्डाणपुलाला ‘भारतरत्न जेआरडी टाटा’ यांचे नाव देण्यात आले असताना प्रत्यक्षात, उड्डाणपुलावर मात्र ‘भारतरत्न’ हा शब्द लिहायचे राहून गेले आहे. ही गंभीर चूक उशिराने लक्षात आली असून त्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार, तातडीने चूक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
जागतिक बँकेच्या सहकार्यातून तसेच केंद्र सरकारच्या निधीतून पिंपरी पालिकेच्या वतीने कासारवाडी येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (१५ फेब्रुवारी) होणार आहे. या नामकरण समारंभासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असतानाच पुलाच्या नावात चूक झाल्याचे लक्षात आले. उड्डाणपुलाच्या दर्शनी भागात ‘जेआरडी टाटा उड्डाणपूल’ असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. मात्र, त्यात ‘भारतरत्न’ हा शब्द लिहण्याचे राहून गेले आहे. ही चूक तातडीने सुधारण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, हा शब्द नव्याने उड्डाणपुलावर लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा