मावळ लोकसभेच्या रिंगणात आमदार लक्ष्मण जगताप यांचा प्रचार करणाऱ्यांना पुन्हा-पुन्हा दम देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालवले असतानाच आता प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही जगतापांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाली असताना जगतापांनी ती नाकारली व राष्ट्रवादीला फसवले आणि आम्हा सर्वाचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजितदादा मावळात ठाण मांडून बसले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांचा प्रचार करण्याचे आवाहन ते सातत्याने करत आहेत. गुरूवारी एकाच दिवशी अजितदादांनी दोन स्वतंत्र बैठका घेतल्या आणि ‘दम’दार भाषेत नार्वेकरांना निवडून आणण्याचे आवाहन पक्षातील नगरसेवकांना केले. त्यापाठोपाठ, जाधव यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले,‘‘ मावळ लोकसभेसाठी जगताप यांच्या नावाची शिफारस स्थानिक पातळीवरून झाली होती. त्यानुसार, त्यांना सहा महिन्यापूर्वीच हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी जगताप यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली आणि राष्ट्रवादीला फसवले. त्यांनी राष्ट्रवादीचा असा विश्वासघात का केला, याची माहिती नाही. मात्र, त्यांनी असे करायला नको होते,’’ अशी टिप्पणी त्यांनी केली.

Story img Loader