‘भीम आर्मी’तर्फे भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार असून ३० डिसेंबर रोजी ही महासभा होणार आहे. या सभेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीतर्फे पुण्यात भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. भीम आर्मीचे पुण्यातील जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ३० डिसेंबर रोजी एसएसपीएमएस मैदानात भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची सभा होणार आहे.या सभेनंतर ३१ डिसेंबर रोजी चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘आंबेडकरी चळवळ’ या विषयावर संबोधित करणार आहे. ‘संवाद आंबेडकरी तरुणांशी’ असे या चर्चासत्राचे नाव आहे.

१ जानेवारी रोजी आझाद हे भीमा कोरेगाव विजयाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला भेट देतील. ‘आझाद यांच्या तीन दिवसीय पुणे दौऱ्याची तयारी सुरु आहे. सभेला परवानगी मिळावी यासाठी आम्ही पुणे पोलिसांकडे अर्ज देखील केला आहे. मात्र, अद्याप पुणे पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही, असे पोळ यांनी सांगितले.

कोण आहे भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद
सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आली होती. तीन वर्षांपूर्वी तरुण वकील चंद्रशेखर यांनी स्थापन केलेल्या दलित तरुणांच्या ‘भीम आर्मी’ने उत्तरेतील सात राज्यांत हातपाय पसरले आहेत. तीन वर्षांपूर्वी सहारनपूरच्या भदो गावात शाळा स्थापन करून दलित मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम संघटनेने हाती घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली. गेल्या वर्षी जूनमध्ये हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती. ५ मे रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्या हिंसाचारात सहारनपूरमधील शब्बीरपूर येथे ४ ठार व १६ जण जखमी झाले होते. या प्रकरणात ते वर्षभर तुरुंगात होते. सप्टेंबर महिन्यात त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.