भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांचं नाव दोषारोपपत्रातून काढून टाकण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. दोषारोप पत्रातून नाव काढल्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेनं आरोप करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेने केली आहे. संघटनेनं याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. भीमा-कोरेगाव दंगलीमध्ये भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचे सांगणाऱ्या नेत्यांची आणि महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावी, यासाठी भिडे गुरुजींवर आरोप करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या वादग्रस्त वक्तव्याचा तपास करावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारं निवेदन संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
कोणताही सबळ पुरावा नसताना, कोणतंही अधिकृत सत्य समोर आलं नसताना काही नेत्यांनी भिडे गुरुजींचा दंगलीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा उतावीळ आरोप केला. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी या दंगलीचा सखोल तपास केला. तपासाअंती न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये भिडे गुरुजी विरोधात एकही पुरावा मिळाला नसल्याने त्यांचं नाव सदर दोषारोपपत्रातून वगळण्यात आलं. त्यामुळे ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भिडे गुरुजींवर आरोप केले, अशा नेत्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.