पुण्यातील वाकड येथे भोंदूबाबाचा विकृतपणा समोर आला आहे. मूळचा बीडचा असलेला आरोपी भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पती स्वतः बीडला जाऊन या भोंदूबाबाला भेटला आणि त्याने पत्नीला कंबरेपासून खाली अपंग करण्याची मागणी केली. यानंतर आरोपीने पीडित महिलेला फोन करून ही विकृत मागणी केली. पोलिसांनी या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत. विलास बापूराव पवार उर्फ महाराज (रा. पिंपळवंडी पाटोदा, बीड) असे या आरोपी भोंदू बाबाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

पीडित महिला आणि तिच्या पतीचे दररोज घरात भांडण होत होते. यानंतर पतीने माझे पत्नीसोबत दररोज भांडण होते. तुम्ही माझ्या पत्नीला जादूटोणा करून कंबरेच्या खाली अपंग करा, अशी मागणी आरोपी भोंदू बाबाकडे केली. त्यानंतर भोंदू बाबाने पीडित महिलेशी फोनवरून संपर्क साधत तुमचा पती तुमचे वाईट करण्यास सांगत आहे. तुम्हाला तुमचा संसार, कुटुंब सुखी ठेवायचा असल्यास माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा, अशी मागणी केली.

भोंदूबाबाला भेटून पतीची पत्नीला कंबरेच्या खाली अपंग करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिलेचे आणि पतीचे फारसे पटत नव्हते. त्यांच्यात दररोज वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडायचे. याच भांडणाला कंटाळून पतीने थेट बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे जाऊन विलास पवार या भोंदू बाबाची भेट घेतली. तिथं माझ्या पत्नीला कंबरेच्या खाली अपंग करून जादूटोणा करा अस सांगितलं. महिलेचा पती तिथे ३-४ दिवस राहिला. त्यानंतर, भोंदू बाबा विलासने स्वतः पीडित महिलेला फोन करून तुझा पती माझ्याकडे आला होता. त्याने तुला कंबरेपासून खाली अपंग करण्यास सांगितले आहे असे सांगितले.

विशिष्ट अवयवावर तीळ असल्याचं सांगत महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवले

भोंदू बाबा दररोज फोन करून महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. भोंदू बाबाने पीडित महिलेला भीती दाखवत तुमच्या पोटात गाठी झाल्या असून तुमचं आयुष्य थोडेच राहिले आहे असं देखील सांगितले. पण, तुम्ही या सर्वातून सुटू शकता, असं म्हणत पर्याय सुचवला. यानुसार ज्या व्यक्तींच्या विशिष्ट अवयवावर आणि तळ हातावर तीळ आहे त्याच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यास तुमचे कुटुंब, संसार सुखी होईल असा दावा केला. यानंतर काही वेळानेच भोंदू बाबाने स्वतःचा अश्लील व्हिडिओ पीडित महिलेला पाठवला. त्यात तळ हातावर आणि विशिष्ट अवयवावर तीळ असल्याचं व्हिडीओमधून त्या महिलेला दाखवलं. तसेच महिलेला फोन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीर संबंध ठेव अशी मागणी भोंदू बाबाने केली.

सापळा रचून वाकड पोलिसांकडून भोंदू बाबाला अटक

या घटनेमुळे पीडित महिला घाबरली. अखेर महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेतली आणि सर्व हकीकत सांगितली. त्यानुसार, भोंदू बाबा विलासवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी पीडित महिलेला बोलवून घेतले. पीडित महिलेला सांगण्यात आलं की, तुम्ही भोंदू बाबाला भेटण्यासाठी पुण्यात बोलवा. मग आम्ही त्याला पकडतो. त्यानुसार, भोंदू बाबाला फोन करून पुण्याला बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी डांगे चौक येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhondubaba demand physical relation to victim women send obscene video in wakad pune kjp pbs