पिंपरी : पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंत महामेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी सकाळी सव्वादहा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस पुलापासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरीपर्यंत धावली मात्र ती निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार महामेट्रोकडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली. महापालिकेनेदेखील या प्रकल्पाला सहमती दर्शवली. त्यानंतर पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली. पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्च येणार आहे. बुधवारी भूमिपूजनानंतर कामाला सुरुवात होईल.
हेही वाचा – ‘पांचजन्य वेणू’मध्ये केशव वेणूसह तीन बासऱ्यांचा मिलाफ
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पिंपरी ते भक्ती-शक्तीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वप्नांचा यानिमित्ताने विस्तार होत आहे. हा मेट्रो मार्ग पुढे किवळे, मुकाई चौक आणि वाकड चौकापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हिंजवडीपर्यंत आलेला मेट्रो मार्ग नाशिक फाटा मार्गे चाकणपर्यंत विस्तारित करण्यासाठी देखील पाठपुरावा करत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.