लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असताना आता या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यावरून वादाला तोंड फुटले आहे. भिडेवाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे, तर न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाले असून, त्याचे श्रेय घेण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

फुले दाम्पत्य हे सत्यशोधक असल्याने स्मारकाच्या भूमिपूजनाऐवजी थेट काम सुरू केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी पालिकेने केला होता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

आणखी वाचा-नगरपरिषद झाली पण सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी मात्र पालिकेवर, नक्की काय आहे प्रकार

फुले दाम्पत्याने १८८५ मध्ये भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच स्वत: पूजाअर्चा आणि कर्मकांडाला तीव्र विरोध करत सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यामुळे भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन न करता येथे पालिकेच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे काम थांबले होते. पुणे दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडेवाड्याच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

भिडेवाड्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. असे असताना या कामाचे पुन्हा भूमिपूजन करणे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. भिडेवाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे, तर न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाले आहे. त्या गोष्टीचे श्रेय घेण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे जगताप म्हणाले.

आणखी वाचा-महाविकास आघाडीला ‘निर्भय बनो’ चा पाठिंबा, जाहीरनाम्यात मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी

‘महात्मा फुले मंडई’ नाव द्या

दरम्यान, पुणे मेट्रोच्या मंडई येथील स्थानकास महात्मा फुले मंडई असे पूर्ण नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhoomipujan of bhidewada national memorial by pm modi criticism of sharadchandra pawar ncp party pune print news ccm 82 mrj