पुणे जिल्ह्याचं विभाजन केलं जावं आणि शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी सोमवारी भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच महेश लांडगेंनी ही मागणी केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. यानंतर रात्री माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “अशा जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या येत असतात”, अशी प्रतिक्रियाही दिली. पण मुळात ही मागणी का केली? यातून कुणाचा आणि कसा फायदा होणार आहे? यासंदर्भात महेश लांडगेंनी टीव्ही ९ शी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकुर्डीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ग. दि. मा. नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महेश लांडगेंनी पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. “पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूच्या भागाला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव दिलं जावं. हे राजकीय विभाजन नसून फक्त जिल्ह्याचं विभाजन असेल”, असं महेश लांडगे या कार्यक्रमात म्हणाले.

“…एवढाच माझा उद्देश होता”

दरम्यान महेश लांडगेंच्या भूमिकेवरून राजकीय चर्चाही घडू लागल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ही मागणी माझी वैयक्तिक आहे. मला वाटतं की शासनाच्या योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लवकर उपलब्ध झाल्या पाहिजेत. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ८० लाखांच्या पुढे गेली आहे. जर विभाजन केलं, तर छोट्यामोठ्या गोष्टी लोकांपर्यंत लवकर पोहोचायला मदत होईल. विद्यार्थ्यांना दाखले, प्रमाणपत्र लवकर हवे असतात. योजना राबवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीची यंत्रणा विभागली गेली, तर त्याचा फायदा लोकांना होतो. जुन्नरच्या कोपऱ्यातल्या आदिवासी बांधवाला अचानक शासकीय यंत्रणेची गरज असेल, तर ती लगेच पुरवता आली पाहिजे एवढाच माझा उद्देश आहे”, असं महेश लांडगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांसमोरच भाजपा आमदारानं केली पुण्याच्या विभाजनाची मागणी; म्हणाले, “या जिल्ह्याला शिवनेरी…!”

“१७२ किलोमीटर जुन्नरच्या कोपऱ्यापर्यंतच्या लोकांना पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात यावं लागतं. माळशिरस, नाणेघाटातल्या माणसाला जर जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं असेल तर त्यासाठी त्याला यंत्रणा लवकर उपलब्ध व्हायला हवी. या प्रवासात त्याचे ४-४ तास जात असतील, तर त्याचा पूर्ण दिवस जातो. त्याचा परिणाम त्याच्या कामावर आणि उत्पन्नावरही होतो”, असाही मुद्दा लांडगे यांनी उपस्थित केला.

“शिवनेरी नावाला लोक विरोध करणार नाहीत”

“त्यांनी तालुक्यातील लोकांशी चर्चा करावी. मला वाटतं की लोकही त्याला विरोध करणार नाही. शिवाय शिवनेरी या नावालाही कुणी विरोध करणार नाही”, असंही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhosari bjp mla mahesh landge demands pune district partition pmw
Show comments