भोसरीच्या चक्रपाणी वसाहतीत महादेवनगरामध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेल्या सांडपाणी समस्येची आयुक्तांनी पाहणी केली. तेथील चित्र पाहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, त्यानंतर तातडीने काम सुरू झाले. मात्र, आयुक्तांची पाठ वळताच ते काम बंद झाले. भोसरीतील एका माजी नगरसेवकाने हे काम बंद पाडल्याचे सांगण्यात येते. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या माध्यमातून आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर दोन दिवसात समस्या मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.
भोसरीच्या महादेवनगरमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून उघडय़ावर सांडपाणी साचते आहे. जागोजागी पावसाचे पाणी आहे. काही रस्ते बंद आहेत. येथील नागरी समस्यांची माहिती आयुक्तांना दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली. त्यानंतर सांडपाण्याचा निचरा करण्याचे काम तातडीने सुरू झाले. मात्र, राजकीय दबावामुळे अवघ्या दोन तासांत ते काम बंद पडले. सांडपाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वैतागलेल्या नागरिकांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन ही समस्या मांडली.
स्थानिकांच्या आपापसातील वादामुळे शेकडो नागरिक वेठीस आहेत. जमिनीच्या तंटय़ामुळे ड्रेनेज जोडू दिले जात नाही. पालिकेचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीचालकास मारहाण केली जाते. पाईप खोदून टाकले जातात, याबाबती माहिती आयुक्तांना देण्यात आली. तेव्हा दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. यासंदर्भात, उबाळे म्हणाल्या, नागरिकांकडून करवसुली केली जाते. मात्र, नागरी सुविधांकडे महापालिका दुर्लक्ष करते. कोणाच्या व्यक्तीगत वादात नागरिकांची फरफट होऊ नये, यासाठी आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालावे.

Story img Loader