भोसरी विधानसभा मतदारसंघामधून आमदार महेश लांडगे यांनी हॅट्रिक केली आहे. महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. महेश लांडगे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे आव्हान होतं. भोसरी विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजणार अशी चर्चा असताना महेश लांडगे विजय झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे अशी लढत होती. भोसरी विधानसभेच्या या आखाड्यात महेश लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना चितपट केलं आहे. अजित पवार गटातून शरद पवार गटात अजित गव्हाणे यांनी प्रवेश केला होता. एक महिना अगोदर अजित गव्हाणे यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला होता. मात्र, त्यांचा महेश लांडगे यांच्यासमोर निभाव लागला नाही. अजित गव्हाणे यांनी वारंवार आरोप- प्रत्यारोप केले त्याचा फायदा त्यांना होऊ शकला नाही. अजित गव्हाणेंसाठी शरद पवार देखील भोसरीच्या मैदानात उतरले तर दुसरीकडे महेश लांडगे यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. “बटेंगे गे तो कटेंगे, एक है तो सेफ है” असा नारा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, याचा देखील फायदा महेश लांडगे यांना झाला.