अजित पवार गटाचे भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. याबद्दल त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी सुतोवाच केले आहे. शरद पवार यांची वेळ घेऊन विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं विक्रांत लांडे यांनी सांगितलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा – पुणे: रास्ता पेठेत ११ लाखांचा गुटखा जप्त; अमली पदार्थ विरोधी विभागाकडून दोघांना अटक
भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे हे त्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे सर्वत्र परिचित आहेत. काल विलास लांडे यांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. आज शरद पवार गटाचे अजित गव्हाणे आणि विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. त्यांची काही वेळ शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. विलास लांडे हे अजित गव्हाणे यांच्या सोबतच शरद पवार गटात येणार होते. परंतु, काही कारणामुळे त्यांचा पक्ष प्रवेश रखडला गेला. दसऱ्याच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात येतील असा विश्वास विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच अजित गव्हाणे यांनी देखील म्हटले आहे की, विलास लांडे हे काही माजी नगरसेवक घेऊन शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नेहमीच संदिग्ध भूमिका असलेले विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतात की यावेळी देखील ते हुलकावणी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.