भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा प्रसिद्धीचा हव्यास आणि कोणालाही विश्वासात न घेता काम करण्याच्या कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही भूमाता ब्रिगेडमधून बाहेर पडलो, असे दुर्गा शुक्रे यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. भूमाता ब्रिगेडमधून बाहेर पडलेल्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप, वर्षां साळवे यांनी ‘भूमाता महिला ब्रिगेड’ या नव्या संघटनेची स्थापना केली आहे.
भूमाता ब्रिगेड या संघटनेच्या दुर्गा शुक्रे, पुष्पक केवाडकर, प्रियंका जगताप, वर्षां साळवे यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय नुकताच घेतला आणि पदांचा राजीनामा दिला. शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी आंदोलन पेटलेले असतानाच भूमाता ब्रिगेडच्या चार महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे तृप्ती देसाई यांच्या कार्यपद्धतीविषयी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर दुर्गा शुक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमाता महिला ब्रिगेड या नव्या संघटनेची स्थापना केली. विशेष म्हणजे संघटनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती केली.
भूमाता महिला ब्रिगेड या नव्या संघटनेची स्थापना करण्यामागचा नेमका विचार काय, या विषयी माहिती देताना दुर्गा शुक्रे म्हणाल्या, की कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवातीपासून काम करत आहोत. शनिशिंगणापूर येथील आंदोलन सुरू झाल्यानंतर तृप्ती देसाई या आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेत नव्हत्या. आम्हाला प्रसिद्धिमाध्यमांपुढे यायची हौसदेखील नाही. देसाई यांचा प्रसिद्धीचा हव्यास आणि कार्यपद्धती पाहून आम्ही संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राजीनामा दिला. भूमाता महिला ब्रिगेड या नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर आम्ही महिलांवर होणारे अन्याय तसेच शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभारणार आहोत.
नवीन संघटना स्थापन केल्यानंतर पुष्पक केवाडकर यांची कार्याध्यक्ष आणि संघटकपदी कमल सावंत यांची निवड करण्यात आली आहे. प्रवक्त्या म्हणून प्रियंका जगताप या काम पाहणार आहेत. खजिनदारपदी वर्षां साळवे यांची निवड करण्यात आली आहे. गेली १६ वर्षे आम्ही निराधार महिला, अपंग यांच्या प्रश्नांवर काम करत आहोत, तसेच पुणे शहरात साडेतीन हजार बचतगटांशी आम्ही जोडलेलो आहोत. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांची वानवा अजिबात नाही. शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर गेल्या वर्षी एका तरुणीने प्रवेश केल्यानंतर बराच गदारोळ माजला होता. त्यानंतर २० डिसेंबर २०१५ रोजी मी, पुष्पक, प्रियंका, वर्षां अशा चौघी शनिशिंगणापूर येथे गेलो होता. आम्ही चौघींनी चौथऱ्यावर प्रवेश केला होता. तेव्हा तेथील सुरक्षारक्षक आणि ग्रामस्थांशी आमचा वाद झाला होता. आमची मोटार जाळण्याची धमकी तेव्हा देण्यात आली होती. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून आम्हाला पुण्याला पाठविले. त्यानंतर २६ जानेवारी रोजी पुण्यात अधिकृत आंदोलनाची घोषणा करण्यात आली, असे दुर्गा शुक्रे यांनी सांगितले.
शनिशिंगणापूर येथील शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्यावा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडने आंदोलन सुरू केल्यानंतर वातावरण ढवळून निघाले. या प्रश्नी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां आणि शनिशिंगणापूर ग्रामस्थांची बैठक झाली. परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. अध्यात्मिक क्षेत्रातील श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी मध्यस्थी करावी अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
तृप्ती देसाई यांच्या प्रसिद्धी हव्यासामुळे संघटना सोडली- दुर्गा शुक्रे
दुर्गा शुक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमाता महिला ब्रिगेड या नव्या संघटनेची स्थापना केली. विशेष म्हणजे संघटनेची स्थापना केल्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आरती केली.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 16-02-2016 at 03:26 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumata brigade split into bhumata mahila brigade