लोणावळा परिसरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणात वर्षांला सहा ते आठ पर्यटक मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या पाच वर्षांत भुशी डॅमध्ये तीस जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही धरण परिसरात जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या ठिकाणी कायमस्वरूपी लाइफगार्ड आणि सुरक्षारक्षक पुरविण्याची मागणी होत आहे. धरणात बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश असून अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.
लोणावळा व परिसरातील मुसळधार पावसामुळे काही दिवसाच भुशी धरण भरून वाहू लागते. धरणाच्या पायऱ्यांवरून वाहत असलेल्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या ठिकाणी हजारोंच्या संख्यने येतात. या ठिकाणी येणारे सर्वाधिक पर्यटक हे तरुणवर्गातील असतात. या ठिकाणी आल्यानंतर अतिउत्साहाच्या भरात ते धरणात पोहण्यासाठी उतरतात. पोहता येत नसतानाही धरणात उतरल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे पोलिसांनी गेल्या वर्षीपासून दुपारी तीननंतर धरण परिसराकडे जाणारा रस्ता बंद करण्यास सुरुवात केली आहे. या धरण परिसरातील साहेबराव चव्हाण, राजू पवार यांनी आतापर्यंत अनेकांना वाचविले आहे. त्यांचा या परिसरात चहा वगैरे विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसाय सांभाळून लाइफगार्ड म्हणून तेच काम करतात.
साहेबराव चव्हाण यांनी सांगितले, की भुशी धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. अनेक जण पोहता येत नसतानाही पाण्यात उतरतात. धरणातील पाणी थंड असते, तसेच पाण्याला प्रवाह असतो. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. पोहताना दम लागून अनेक जण बुडतात. तसेच, या ठिकाणी आलेल्या अनेक पर्यटकांनी मद्यपान केलेले असते. अनेक वेळा हे पर्यटक पोलिसांबरोबर हुज्जतही घालतात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या महिला पोलिसांबरोबर तरुणी हुज्जत घालतात. धरणात बुडणाऱ्या अनेकांना आतापर्यंत मी सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांच्या मदतीने येथे सूचना देणारे फलक लावले आहेत. पाण्यात फार मस्ती केली जाते आणि तसे प्रकार मृत्यूस कारणीभूत ठरतात.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की भुशी धरण हे रेल्वेच्या हद्दीत येते. पण, रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. या ठिकाणाही एकही सुरक्षारक्षक आणि लाइफगार्ड ठेवलेला नाही. पोलिसांकडूनच या ठिकाणी सुरक्षा पुरविण्यात येते. तरीही पर्यटक पोलिसांसोबत नेहमीच हुज्जत घालतात. एका स्थानिक नागरिकाने सांगितले, की स्थानिक प्रशासनाने कायमस्वरूपी लाइफगार्ड नेमणे गजरेचे आहे. या ठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. तरीही त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा