लोणावळा : लोणावळा, खंडाळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वर्षांविहारासाठी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला. लोणावळा धरणाच्या परिसरातील नौसेना बाद येथे पोलिसांनी तपासणी नाके सुरू केले आहेत. या भागात पर्यटकांना माहिती देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. आठवडय़ातील सर्व दिवस सायंकाळी पाचनंतर भुशी धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे, असे लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळी पाचनंतर भुशी धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची वाहने माघारी पाठविण्यात येणार आहे. पर्यटकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.  पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. हुल्लडबाज तसेच मद्यपींच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी भुशी धरण परिसरात मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. अपघातांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्याचे  निरीक्षक डुबल यांनी सांगितले.  लोणावळा परिसरात धुके पडले आहे. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोणावळय़ात २४ तासांत २१३ मिमी पाऊस..

लोणावळय़ात मंगळवारी २४ तासांत २१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच दरम्यान लोणावळा परिसरात १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास पुढील २४ तासांत लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन टाटा कंपनी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. मावळ तालुक्यातील  मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणे निम्म्याहून जास्त भरली आहेत.