दहीहंडीनिमित्त स्पीकरच्या भिंती, भरघोस बक्षिसे, सिनेतारकांची हजेरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची परंपरा आयोजकांनी याही वर्षी कायम ठेवली आहे. उंचच्या उंच हंडी, स्पीकरच्या भिंती, लाखोंची बक्षिसे, सिनेतारकांची हजेरी आणि हजारोंच्या संख्येने होणारी नागरिकांची गर्दी, असे दहीहंडीचे चित्र दिसून येते. गेल्या वर्षी पालिकेच्या निवडणुका तोंडावर होत्या, म्हणून आयोजक वाढले होते, ते यंदा कमी झाले आहेत. मात्र, गोविंदांचा उत्साह कायम आहे.

यंदा स्वातंत्र्यदिन आणि गोपाळकाला एकाच दिवशी आहे. सकाळी देशभक्तीपर आणि संध्याकाळी गोविंदांच्या गाण्यांची दिवसभर रेलचेल राहणार आहे. पारंपरिक उत्सवाच्या नावाखाली दहीहंडीत लाखो रुपयांची उधळपट्टी होते, नियमांची पायमल्ली होते, यावरून आयोजकांवर कितीही टीका झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. यंदा आयोजकांमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या जास्त दिसून येते. उत्सवाच्या निमित्ताने आपापल्या भागात वातावरणनिर्मिती करण्याची संधी राजकीय मंडळींनी सोडलेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी उत्सवाचे लोण वेगाने पसरले आहे. भोसरी, पिंपरीगाव, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, चिंचवड, प्राधिकरण, कासारवाडी, दापोडी आदी भागांत मोठय़ा व खर्चिक दहीहंडय़ा उभारण्यात येतात. त्यासाठी बरेच दिवस आधी तयारी सुरू होते. काही ठिकाणी रस्ते बंद करून दहीहंडी लावल्या जातात. दहीहंडीचे प्रमुख आयोजक राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते व नगरसेवक हेच असतात. त्यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांचा वरदहस्त असतो. राजकीय नेत्यांची आवर्जून उपस्थिती राहते. त्यामुळे पालिका व पोलीस यंत्रणेला दबावाला सामोरे जावे लागते, हे उघड गुपित आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुका होत्या, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी दहीहंडीच्या लोकप्रियेतेचा पुरेपूर फायदा उठवला. गेल्या वर्षी दहीहंडय़ांची संख्या अचानक वाढली होती. त्या तुलनेत यंदा दहीहंडी साजरी करणाऱ्यांची संख्या कमी जाणवते आहे.

दहीहंडीचा आयोजक ते नगरसेवक

दहीहंडीचा आयोजक नगरसेवक असणे किंवा नगरसेवकाने दहीहंडीचे आयोजन करणे, असे सूत्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून येते. अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, राहुल कलाटे, हर्षल ढोरे, संदीप वाघेरे, मोरेश्वर शेडगे, रोहित काटे, सचिन चिखले, राजू मिसाळ, शत्रुघ्न काटे अशी बरीच नावे आहेत. यापूर्वी, एखाद्या गावाचा उल्लेख करून ‘अखिल’ अशा पध्दतीचे मंडळाचे नाव होते. आता प्रभागाचे वाढलेले क्षेत्र लक्षात घेता बऱ्यापैकी नामविस्तार झालेला दिसतो.

चित्रपट, मालिकांतील कलाकारांची हजेरी

लाखो रुपयांचे मानधन देऊन दहीहंडीसाठी कलाकारांना आमंत्रित केले जाते, त्यामागे गर्दी खेचणे हेच प्रमुख कारण असते. याही वेळी चित्रपट व मालिकांमधील आघाडीच्या कलावंतांची हजेरी लागणार आहे, त्यासाठी लाखो रुपये मोजण्यात आले आहेत. ध्वनिक्षेपक यंत्रणा, भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big cash prize and celebrities to be present in dahi handi festival 2017 in pimpri chinchwad