राज्यातील साडेसहा लाख सराईत गुन्हेगारांच्या अंगुली मुद्रा ‘अ‍ॅम्बीस’ प्रणालीने एकत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरफोडी, जबरी चोरी, खून, दरोडय़ासह गंभीर गुन्ह्य़ांत अटक करण्यात आलेल्या राज्यातील साडेसहा लाख सराईत गुन्हेगारांच्या अंगुली मुद्रा (फिंगर प्रिंटस) आता ‘अ‍ॅम्बीस’ या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पोलिसांना उपलब्ध झाल्या आहेत.

या कार्यप्रणालीसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष प्रयत्न केले होते. मेसा (महाराष्ट्र एनलोरमेंट सव्‍‌र्हीस अ‍ॅप्लीकेशन) या संस्थेने ही संगणकीय प्रणाली विकसित केली असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिली.

एखाद्या गुन्हयात अटक झालेल्या आरोपीची माहिती (बायोमेट्रीक) स्कॅनरद्वारे घेण्यात येणार आहे. त्यात आरोपींच्या बोटांचे ठसे, तळहाताचे ठसे, बुबुळे, डिजिटल प्रतिमा आदीचा समावेश आहे.

पुणे शहरातील अडीच लाख सराइतांची माहिती ‘अ‍ॅम्बीस’वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरातील ३० पोलीस ठाण्यांना त्याबाबतचे साहित्यही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई, नाशिक आणि राज्यातील इतर भागांमधील चार लाख सराईत गुन्हेगारांचा तपशीलही या प्रणालीमध्ये नोंदविण्यात आला आहे.

उपयुक्तता कशी?

*अ‍ॅम्बीस’ (अ‍ॅटोमेटेड मल्टी-मोडल बायोमेट्रीक आयडेंटेफीकेशन सिस्टीम) ही प्रणाली पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्य़ात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना उपलब्ध झालेले सराइत गुन्हेगारांचे ठसे *अ‍ॅम्बीस’या प्रणालीवर त्वरित पाठविता येईल. घटनास्थळी सापडलेले ठसे, तसेच ‘अ‍ॅम्बीस’वर असलेले ठसे जुळल्यास त्वरित गुन्हेगाराचा माग काढणे शक्य होईल.

सर्व पोलीस ठाण्यांना उपलब्ध..

ही माहिती मुंबईतील बीएसएनल डाटा सेंटरच्या सव्‍‌र्हरवर साठविण्यात येईल. एख्याद्या गुन्ह्य़ात अटक झालेल्या आरोपीचा या पूर्वी एखाद्या गुन्ह्य़ात समावेश होता किंवा कसे, याबाबतची माहिती या प्रणालीमुळे त्वरित उपलब्ध होणार आहे. घटनास्थळावर उपलब्ध असलेले ठसे (चान्सप्रिंट) घेण्यासाठी या कार्यप्रणालीचे साहित्य राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.