पुणे : पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारच्या वेळेत तीन तास बंद असते. लोहमार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद ठेवली जाते. त्यामुळे दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. आता प्रवाशांच्या सोईसाठी दुपारच्या वेळी लोकलची एक फेरी सुरू करण्यास रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. पुढील दोन आठवड्यांत प्रत्यक्ष ही फेरी सुरू होणार आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या दिवसभरात ४० फेऱ्या होतात. या लोकलने दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे-लोणावळा लोकल सेवा सकाळी ११ वाजून १५ मिनिटे ते दुपारी ३ या काळात बंद असते, तर लोणावळा-पुणे लोकल सेवा सकाळी १० ते दुपारी २ वाजून ५० मिनिटे या कालावधीत बंद असते. यामुळे दुपारी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाविद्यालये दुपारी सुटतात अशा विद्यार्थ्यांना लोकलसाठी काही तास स्थानकावर प्रतीक्षा करीत थांबावे लागते अथवा इतर पर्यायांचा प्रवासासाठी वापर करावा लागतो.
आणखी वाचा-पुण्यातील रखडलेले रस्ते आता ‘मार्गावर’… महापालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
मागील वर्षी झालेल्या रेल्वेच्या आढावा बैठकीत खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारी सुरू ठेवण्याची सूचना केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. रेल्वेकडून शिवाजीनगर-लोणावळा आणि लोणावळा-शिवाजीनगर अशी प्रत्येकी एक लोकल दुपारी सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाला पाठविण्यात आला होता. रेल्वे मंडळाने याला हिरवा कंदील दाखविला असून, पुढील दोन आठवड्यात या दोन लोकल सुरू होतील, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
देखभाल व दुरुस्तीसाठी पावणेतीन तास
पुणे-लोणावळा लोकल सेवा देखभाल व दुरुस्तीसाठी दुपारी तीन तास बंद ठेवण्यात येते. या कालावधीत लोहमार्गाची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तपासणी यासह इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे केली जातात. आता दुपारी दोन लोकल सोडण्यात येणार असल्याने या मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पावणेतीन तासांचा कालावधी मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-पुण्यात खाऊ गल्लीसाठी महापालिकेचे नवे धोरण
अशा असतील दोन नवीन लोकल
- शिवाजीनगर ते लोणावळा
दुपारी १२.०५ वाजता सुटून १.२० वाजता पोहोचणार
- लोणावळा ते शिवाजीनगर
दुपारी ११.३० वाजता सुटून १२.४५ वाजता पोहोचणार