पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.
गेल्यावर्षीपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचून त्याचे आकलन होण्यापूर्वी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या वेळेच्या दहा मिनिटे आधी करण्यात येत होते. मात्र प्रश्नपत्रिका मोबाइलवर, तसेच अन्य समाज माध्यमातून पसरण्याच्या घटना घडल्याचे, अफवा निर्माण झाल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासह परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या वेळेआधी दहा मिनिटे वितरीत करण्याची सुविधा गेल्यावर्षीपासून (फेब्रुवारी-मार्च २०२३) परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
हेही वाचा : बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार
या पार्श्वभूमीवर, पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून आणि विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षादरम्यान सकाळ सत्रात अकरा वाजता, दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.