पुणे : रुबी हॉल रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने याबाबतचा आदेश मंगळवारी काढला. चौकशी समितीच्या सदस्य सचिवपदी आरोग्य सेवा संचालक असून, पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, आरोग्य सेवा सहायक संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालयातील विधी सल्लागार भाग्यश्री रंगारी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन माजी संचालक डॉ. प्रवीण शिंगारे, मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. वत्सला त्रिवेदी, बॉम्बे रुग्णालयातील मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बच्चू, मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. भरत शहा, पुण्यातील मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. अरुण तिरलापूर हे सदस्य आहेत.
हेही वाचा – धक्कादायक..! मुलगा न झाल्याने जुळ्या मुलींचा खून; वडिलांसह चौघांवर गुन्हा
रुबी हॉल क्लिनिकमध्ये २४ मार्च २०२२ रोजी झालेल्या अवैध मूत्रपिंड प्रत्यारोपणात रुग्णालयाचा सहभाग होता की नाही, याची चौकशी समिती करणार आहे. या प्रकरणात अनियमितता झाली का, याचाही शोध समिती घेणार आहे. याप्रकरणी झालेल्या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला जाणार आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी समिती उपाययोजनाही सुचविणार आहे. ही समिती रुग्णालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची छाननी करणार आहे.
हेही वाचा – धोका वाढला! डेंग्यूमुळे पुण्यात वर्षातील पहिला बळी
नेमके प्रकरण काय?
सारिका सुतार या महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून अमित साळुंखे या रुग्णाने रुबी हॉलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. साळुंखे याने दिलेली बनावट कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने मूत्रपिंड प्रत्यारोपणास परवानगी दिली होती. सारिका सुतार यांना पूर्ण पैसे न मिळाल्याने त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार नंतर पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.