दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : बिगर बासमती आणि तुकडा तांदळाच्या निर्यात बंदीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ मध्ये बासमतीच्या निर्यातीत ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अपेडाने म्हटले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीत वाढ १५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत बासमती तांदळाच्या निर्यात मूल्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यात झालेल्या बासमतीचे मूल्य गेल्या आर्थिक वर्षीच्या याच कालावधीतील ३.३३ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ३.९७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. तसेच निर्यातीच्या प्रमाणातही (वजन) ११ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३१.९८ लाख टनांवरून या वर्षी ३४.४३ लाख टनांवर निर्यात झाली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत निर्यातीतील वाढ १५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा-पुण्यातील अमली पदार्थ तस्करीत मोठी अपडेट; तब्बल ५५ कोटी रुपयांचे किमतीचे मेफेड्रॉन जप्त
देशात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाला जगातील प्रमुख बाजारपेठांमधून मोठी मागणी आहे. प्रामुख्याने इराण, इराक, सौदी अरेबिया, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात या पाच देशांमध्ये बासमती तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.
निर्यातीवरील निर्बंधांचा परिणाम
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याचा परिणाम म्हणून देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनात घट येण्याचा अंदाज होता. त्यामुळे बिगर बासमती, तुकडा तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने निर्बंध लादले आहेत. देशातून फक्त बासमती आणि २० टक्के निर्यात करासह उकडा तांदूळ निर्यातीला परवानगी आहे. त्यामुळे जगभरातील खवय्यांना देशातून निर्यात होणाऱ्या इंद्रायणी, कोलम, सोनामसुरी सारखा दर्जेदार तांदूळ मिळाला नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी बासमती तांदळाला पसंती दिली आहे. त्याचा परिणाम म्हणून बासमतीच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.
आणखी वाचा-पिंपरी : पाळीव श्वानाचा तरुणाला चावा, महिलेविरोधात गुन्हा
बिगर बासमतीवरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी
दरवर्षी देशातून ३० ते ३५ लाख टन बासमतीची निर्यात होते. यंदा मार्चअखेर सुमारे ४० लाख टन बासमतीची निर्यात होण्याचा अंदाज आहे. निर्यातमूल्यातही मोठी वाढ होणार आहे. भारत जगाला बासमती तांदळाचा पुरवठा करणारा प्रमुख देश आहे. सरकारने बिगर बासमती आणि तुकडा तांदळावरील निर्यात बंदी उठविण्याची गरज आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे १५० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली होती, अशी मागणी तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी केली आहे.