देशाचे मंत्रिमंडळ विकले गेले असून राज्यकर्ते मोठय़ा उद्योगपतींचे दलाल बनले आहेत, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे केली. महाराष्ट्रात जेमतेम २५ घराणी वर्षांनुवर्षे राज्य चालवत असून ही घराणेशाही कायम राहिल्यास पुढील २५ वर्षांत त्यांना ‘राजेपण’ मिळालेले असेल आणि जनता गुलाम झालेली असेल, अशी टिपणीही त्यांनी केली.
शाहूनगरच्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेत ‘लोक आणि लोकशाही’ या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संयोजक नगरसेवक नारायण बहिरवाडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, भगवान पठारे, राजेंद्र घावटे, रवी नामदे आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाले, दिल्लीत गांधी घराणे तर पवार, ठाकरे, मोहिते, राणे, नाईक, भुजबळ अशी २५ घराणी वर्षांनुवर्षे महाराष्ट्रात घराणेशाहीचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात सर्वपक्षीय निर्लज्जपणा सुरू असून बाहेरून काहीही दाखवण्यात येत असले तरी आतून सगळे एकच आहेत. मराठवाडय़ात फक्त पाण्याचा दुष्काळ आहे. मात्र तरीही दारू, मटक्याचे तसेच मोबाईल व आयफोनचे धंदे व्यवस्थित सुरू आहेत. देशासमोर मोठी आव्हाने असून समाजात दुही निर्माण करणारी परिस्थिती आहे. जाती-पातीचा कहर झाल्याने देशाची दुर्दशा झाली. सगळ्या महापुरुषांना विसरून त्यांना जातीच्या विळख्यात ओढण्याचे काम झाले आहे. यापुढे जातीच्या वाटणीतून बाहेर न आल्यास देश एकसंध राहणार नाही. खरे चोर कार्पोरेट क्षेत्रात असून त्यांनी देश विकायला काढला आहे. ९० टक्के लूट बडय़ा कंपन्यांकडून होते. देशातील विविध कंपन्यांना ५० हजार कोटींची करमाफी दिली गेली. सामान्यांसाठी काही द्यायची वेळ आली की सांगोपांग चर्चा घडवली जाते. मात्र अंबानीसारख्यांना बिनबोभाट सगळे काही मिळते. महिला विधेयक, भूसंपादन विधेयक मंजूर होत नाहीत. लोकपाल विधेयकाची संसदेत सर्वपक्षीय कत्तल करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला, याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले.
..मंत्रिपदाच्या लायकीचे आहोत का?
नाशिकचा लाचखोर अभियंता सतीश चिखलीकरने कोटय़वधींची माया कमविली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाकाखाली हे सगळे चालले होते, त्यांना माहिती नव्हते का, त्यांचा आशीर्वाद नव्हता, असे कसे म्हणायचे. मंत्रिपदावर राहण्यास आपण लायक आहोत का, याचा विचार भुजबळांनी करावा, असे विश्वंभर चौधरी या वेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा