लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील २० जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या गावांमधील सुविधा क्षेत्राच्या (ॲमेनिटी स्पेस) जागा ताब्यात आलेल्या आहेत. त्यातील जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी दिल्या जाणार आहेत. या टाक्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर तेथे सुमारे साडेतीन लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार असून, यामुळे जवळपासच्या भागातील पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी ११ गावे २०१७ साली तर २३ गावे २०२१ मध्ये महापालिकेच्या हद्दीत आली. यातील फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे वगळून तेथे स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याचा अध्यादेशदेखील काढण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांची संख्या ३२ इतकी आहे.
आणखी वाचा-महापालिकेची कामगिरी १८ दिवसात केल्या २७ मिळकती सील!
पुणे महापालिकेच्या हद्दीत आलेल्या या गावांमध्ये सध्या उपलब्ध असलेले जलस्रोत आणि टँकर या माध्यमातून पाणी दिले जाते. येथील नागरिकांना महापालिकेतील इतर भागातील रहिवाशांप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने येथे पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. यापैकी वाघोली, लोहगाव, सूस म्हाळुंगे, बावधन येथील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. पाण्याच्या टाक्यांसाठी जागा मिळाव्यात, अशी मागणी पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे केली होती. महापालिकेत सुविधा क्षेत्र समितीची बैठक झाली. यामध्ये आठ गावातील २० जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागांवर पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून टाक्यांची कामे केली जाणार आहेत.
या बैठकीत आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रूक, सूस, म्हाळुंगे, बावधन, जांभूळवाडी, लोहगाव, वाघोली या गावांत जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी मिळाल्या आहेत. या जागा पाणीपुरवठा विभागाकडे आल्यानंतर आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या ताब्यात घेतल्या जातील. त्यानंतर तेथे पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
आणखी वाचा-पिस्तूल बाळगणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला पकडले, पिस्तुलासह काडतूस जप्त
याबाबत अधिक माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, समाविष्ट गावांमध्ये आवश्यक असलेला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आराखडे तयार केले आहेत. पाणीपुरवठ्याच्या काही योजनांचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो तेथे एकूण पाणीपुरवठ्याच्या एक तृतीयांश पाणी साठा होईल इतक्या क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे. टाकी बांधण्यासाठी २० जागा देण्याचा निर्णय झाला आहे. याचा मोठा फायदा त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी होणार आहे.